मुंबई – योगगुरू बाबा रामदेव यांच्या पतंजलीने करोनावरील औषध कोरोनिल हे आता बंदीच्या कचाट्यात सापडले आहे. कारण आयुष मंत्रालयाने जाहिराती थांबवल्यानंतर आधी राजस्थान, मग आता महाराष्ट्र सरकारने या औषधावर बंदी घातली आहे. याबाबतची गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्विट करून माहिती दिली. कोरोनिल या औषधाची वैद्यकीय चाचणीबाबत ठोस माहिती समोर आलेली नाही, त्यामुळे महाराष्ट्रात कोरोनिल औषधाच्या विक्रीला परवानगी दिली जाणार नाही, असे त्यांनी सांगितले.
अनिल देशमुख म्हणाले, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स, जयपूरद्वारे पतंजलीने कोरोनिल या औषधाची वैद्यकीय चाचणी केली होती की नाही याबाबत माहिती घेईल. आम्ही बाबा रामदेव यांना इशारा देतो की, आमचं सरकार महाराष्ट्रात नकली किंवा बनावट औषधांच्या विक्रीला परवानगी देणार नाही, असे त्यांनी सांगितले.
दरम्यान, आयुष मंत्रालयानेही रामदेव बाबांच्या कोरोनिल या औषधावर आक्षेप घेतला होता. त्यानंतर राजस्थान सरकारने या औषधावर बंदी घातली आहे. आयुष मंत्रालयाच्या परवानगीशिवाय कोणतेही औषध करोना संसर्ग रोखण्यासाठी वापरले जाणार नाही, असे राजस्थान सरकारने म्हटले आहे. जर अशी औषधे विकली तर कारवाई करू, असा इशाराही राजस्थान सरकारने दिला आहे.