स्थायी समिती अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल

पुणे –महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदासाठी भाजपकडून नगरसेवक हेमंत रासने आणि राष्ट्रवादी-कॉंगेस-शिवसेना महाविकास आघाडीकडून नगरसेवक अशोक कांबळे यांनी सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. महापालिकेत भाजपची एकहाती सत्ता असल्याने स्थायी समितीमध्ये भाजपची सदस्य संख्या जास्त आहे. त्यामुळे रासने यांचा विजय निश्‍चित मानला जात आहे.

स्थायी समिती अध्यक्ष सुनील कांबळे आणि पीएमपीएमएलचे संचालक सिद्धार्थ शिरोळे हे आमदार म्हणून निवडून आल्यानंतर एकाकडे दोनपदे नकोत या पक्षनियमांमुळे आणि इतर नगरसेवकांनाही काम करण्याची संधी मिळावी, यासाठी दोन्ही आमदारांचे नगरसेवक पद कायम ठेवून त्यांच्याकडे असलेल्या पदाचा राजीनामा घ्यावा, असे आदेश भाजप नेत्यांनी दिले होते. याशिवाय अन्य सदस्यांना संधी मिळावी, या दृष्टीकोनातून सभागृहनेते श्रीनाथ भिमाले यांनीही राजीनामा द्यावा, असा आदेश दिला होता. त्यानुसार तीनही पदाधिकाऱ्यांनी आपले राजीनामे सादर केले आहेत.

रासने यांनी सोमवारी आपला उमेदवारी अर्ज नगरसचिव सुनील पारखी यांच्याकडे सादर केला. यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ, उपमहापौर सरस्वती शेंडगे, सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, आमदार सुनील कांबळे, धीरज घाटे, राजेंद्र शिळीमकर, दीपक पोटे, राजेश येनपुरे, नगरसेविका गायत्री खडके उपस्थित होते.

अशोक कांबळे यांनीही स्थायीच्या अध्यक्षपदासाठी पारखी यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी आमदार चेतन तुपे, विरोधी पक्षनेते दिलीप बराटे, नगरसेवक महेंद्र पठारे, गणेश ढोरे, कॉंग्रेसच्या नगरसेविका वैशाली मराठे, स्मिता कोंढरे, शिवसेनेचे नगरसेवक विशाल धनवडे उपस्थित होते.

13 डिसेंबर ठरणार स्थायी अध्यक्ष
विभागीय आयुक्‍तांच्या आदेशानुसार स्थायीच्या अध्यक्षपदाची 13 डिसेंबर (शुक्रवारी) रोजी सकाळी 11 वाजता खास सभेत निवडणूक होणार आहे. स्थायीच्या 16 सदस्यांपैकी भाजपचे 10 सदस्य आहेत. तर राष्ट्रवादीचे 4 आणि कॉंग्रेस-शिवसेनेचा प्रत्येकी 1 सदस्य आहे. या निवडणुकीला पीठासीन अधिकारी म्हणून पीएमपीएमएलच्या अध्यक्षा आणि व्यवस्थापकीय संचालक नयना गुंडे यांची विभागीय आयुक्‍तांनी नियुक्‍ती केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.