पुणे-करोनासदृश लक्षणे आढळल्यास अनेकांनी आता “सेल्फ टेस्टिंग किट’ वापरण्याला सुरूवात केली आहे. त्यातून औषधांच्या दुकानातून आणण्यापेक्षा ऑनलाइन मागवणाऱ्यांची संख्याही जास्त आहे. मात्र, हे किट नीट वापरता आले नाही तर त्याचा “रिझल्ट’ नेमका समजत नाही आणि पर्यायाने आपली टेस्ट “निगेटिव्ह’ आहे, या भ्रमात ते राहतात आणि असे नागरिक करोना पसरवत राहतात.
करोना सदृश लक्षणे असल्यास प्राथमिकता म्हणून घरच्या घरी टेस्ट करणे आणि त्यात जर पॉझिटिव्ह आढळले तर लगेचच विलगीकरणाचा मार्ग पत्करणे हा या “सेल्फ टेस्टिंग किट’ उपलब्ध करून देण्यामागचा स्पष्ट हेतू आहे. लक्षणे असतील आणि तरीही टेस्ट निगेटिव्ह आली तर “आरटीपीसीआर’ करणे बंधनकारक आहे, हा देखील नियम आहे. मात्र, या किटद्वारे घरच्या घरी किती जणांना टेस्ट करता येते तसेच जो काही रिझल्ट येईल, तो दिलेल्या ऍपवर कितीजण लोड करतात, याविषयी मात्र शंका आहे.
लॅबमध्ये ज्या टेस्ट केल्या जातात तेथे प्रशिक्षित कर्मचारीवर्ग असतो. त्यामुळे नमुना कसा घ्यायचा हे त्यांना माहित असते. घरी टेस्ट करताना त्याची प्रक्रिया वाचून करत असले तरी ती अचूक येईल की नाही हे सांगता येत नाही. त्यामुळे “आरटीपीसीआर’ करून घेणे आवश्यकच आहे. नाहीतर ते समाजात करोना व्हायरस पसरवू शकतात.- डॉ. अपर्णा जोशी,
सचिव, इंडियन असोसिएशन ऑफ प्रॅक्टीसींग पॅथॉलॉजी