आमदार संग्राम थोपटे : मतदारांच्या घेतल्या गाठीभेटी
भोर – भोलावडे हे भोर तालुक्यातील एक आदर्श गाव आहे. या गावच्या हद्दीतील शासकीय भूखंडावर 5 एकरात क्रीडा संकुल उभारण्यात येणार आहे. या क्रीडा संकुलनामुळे भोलावडे गावच्या वैभवात भर पडणार असल्याचे प्रतिपादन भोर विधानसभा मतदारसंघाचे महाआघाडी कॉंग्रेसचे उमेदवार आमदार संग्राम थोपटे यांनी केले.
महुडे खोऱ्यातील विविध गावात आमदार थोपटे यांनी नुकताच कार्यकर्त्यांसमवेत प्रचार दौरा केला, त्यावेळी भोलावडे येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी भोर तालुका कॉंग्रेसचे अध्यक्ष शैलेश सोनवणे, जिल्ह्याचे उपाध्यक्ष कृष्णाजी शिनगारे, जिल्हा परिषद सदस्य विठ्ठल आवाळे, सरपंच कविता थोरात, उपसरपंच सविता आवाळे, आनंदा आंबवले, राजगडचे संचालक राजेश काळे, कालिदास आवाळे, सुनिल आवाळे, भोर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मिलिंद आवाळे, गणेश आवाळे, ऍड. विजय दामगुडेपाटील, विठ्ठल आवाळे, दत्तात्रय गावडे उपस्थित होते.
आमदार थोपटे म्हणाले की, भोलावडे गाव गेल्या 45 वर्षांपासून कॉंग्रेसच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहे. या गावाची लोकसंख्या वाढली असताना आज नागरिकांना पिण्याचे मुबलक पाणी मिळावे यासाठी 5 कोटी खर्चाची नवीन पाणी योजना मंजूर केली आहे. यापूर्वी नीरा नदीच्या काठावार विहीर खोदून 2 कोटी रुपये खर्चाची पाणी योजना सुरू केल्याने पिण्याचे मुबलक पाणी उपलब्ध करुन दिल्याने महिलांच्या डोक्यावरील हंडा उतरवण्याचे काम कॉंग्रेस माध्यमातून झाले आहे.
ग्रामदैवत श्री भैरवनाथाचे मंदिरासाठी आजपर्यंत 57 लाखांचा निधी दिला आहे. सव्वाकोटी रुपये खर्चाचे हे ग्रामदैवताचे मंदिरास निधी कमी पडू देणार नसून लवकरच हे काम पूर्ण करू, तसेच येथील नीरा नदी पात्रात नौकाविहार केंद्र सुरू करण्यात येणार आहे. नीरामाता वाळवंट मंदिरा समोरील शनिघाचे सुशोभिकरण आणि पडझड झालेल्या संरक्षण भिंतीचेही काम केले जाणार असून भोलावडेचा सर्वांगिण विकास केला जाईल, असे त्यांनी नमूद केले. दरम्यान, यावेळी आमदार संग्राम थोपटे यांचा ग्रामस्थांच्या वातीने सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक दत्तात्रय गावडे यांनी तर सूत्रसंचालन किशोर आवाळे यांनी केले
राज्यात यावेळी आघाडीचेच सरकार येणार असल्याचे संकेत असून आमदार संग्राम थोपटे यांचा मंत्रीमंडळात समावेश होणार आहे. त्यांचा पहिला सत्कार करण्याचा मान भोलावडे गावास मिळावा अशा त्यांना शुभेच्छा आहेत. तुमच्या विजयासाठी संपूर्ण भोलावडे गाव वचनबद्ध आहे.
– विठ्ठल आवाळे, सदस्य, जिल्हा परिषद