पूरग्रस्तांना आलेल्या मदतीची होतेय लूट

तरुणांनो थोडसं सामाजिक भान असू द्या

नवनाथ पाटील

शिराळा – सांगाली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्याला वारणा, कृष्णा नदी व पंचगंगा नद्यांच्या महापूराचा तडाखा बसला. अनेक घरे, संसार उद्‌ध्वस्त झाले. कसं जगायचं आणि काय करायचं, असा प्रश्‍न पूरग्रस्तांना पडला असताना काही माथेफिरू, स्वार्थी, मतलबी युवक तसेच राजकारणी या पूरग्रस्तांना आलेली मदत लुटत असल्याचा प्रकार सध्या काही ठिकाणी पहायला मिळत आहे. पूरग्रस्तांपर्यंत मदत पोहोचणे गरजेचे आहे. यासाठी स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांनी भान ठेवून बाहेरून आलेली मदत पूरग्रस्तांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांना योग्य ते सहकार्य केले पाहिजे. मदत करणाऱ्यांनी माणुसकीच्या या नात्याने मदत केली आहे, याचे भान ठेवले पाहिजे.

कधी नव्हे ते यावर्षी सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी झाली. याचा परिणाम म्हणून वारणा, कृष्णा, पंचगंगा नद्यांना महापूर आला. या महापुरामुळे सांगली, कोल्हापूर, सातारा या जिल्ह्यांतील काही गावे जलमय झाली होती. अनेक घरे पाण्यात बुडाली. पै-पै साठवून उभारलेला संसार पाण्यात बुडतानाचे पाहून अनेकांचे डोळ्यांतून पाण्याचा पूर वाहू लागला. अनेकजण हताश होवून पहात राहण्याशिवाय दुसरे काहीच करू शकले नाहीत.

आपला संसार आहे तसा सोडून अनेकजण जीव वाचवण्यासाठी सुरक्षित ठिकाणी गेले. या महापूरामुळे कोट्यवधीचे नुकसान झाले. सध्या पूर ओसरला आहे. अनेक जण आपापल्या घराकडे जावून घरात साचलेली घाण, माती काढण्याचे काम करू लागली आहेत. तर काही जणांचे पडलेल्या घरांकडे पाहून पुन्हा संसार कसा उभारायचा याचा विचार करू लागले आहेत.

हे सर्व होत असताना दुसरी एक चांगली बाजू म्हणजे आजही समाजात माणूसकी शिल्लक आहे. आज सांगली, कोल्हापूर, सातारा या पूरग्रस्तांसाठी संस्था, संघटना, राजकीय पक्ष, स्वंयसेवी संस्था पुढे येवून “एक हात मदतीचा’ देवू लागले आहेत. एक सामाजीक बांधिलकी जपण्याचे कार्य या संस्था करू लागल्या आहेत. आजही माणूसकी शिल्लक आहे, हे यावरून समजून येते.
परंतु याच्या उलट काही ठिकाणी पहायवयास मिळते.

ज्या संघटना, संस्था पूरग्रस्तांना मदत घेवून येत आहेत. त्या मदतीच्या वाटपावरून गोंधळ उडू लागला आहे. काही स्वार्थी, मतलबी, राजकारणी जे मदत घेवून येणारी वाहने आहेत. त्यांना आम्हीच पूरग्रस्त आहोत. म्हणून आडवे जातात व त्यांच्याकडून आलेली मदत घेतात. हे अनेक ठिकाणी घडू लागले आहे.

याबाबत काही क्‍लिप्स सोशल मीडियावरून व्हायरलही झाल्या आहेत. जे खरोखर पूरग्रस्त आहेत. ज्यांचे खरोखर नुकसान झाले आहे. त्यांच्यापर्यंत मदत पोहोचणे गरजेचे आहे. आलेल्या मदतीने कमीत-कमी त्यांचे झालेले नुकसान भरून येणार नाही. परंतु त्यांना एक माणुसकीची साथ मिळाल्याचे समाधान तर मिळेल. आज ज्यांना आपण पूरग्रस्त म्हणून संबोधित आहोत.

या नैसर्गिक कारणांमुळे त्यांच्यावर ही वेळ आली आहे. याचंही भान सेल्फी घेणाऱ्या तरुणाईने घेतले पाहिजे. पुरामुळे नुकसान झालेले पूरग्रस्त म्हणजे गरीब नाहीत. याचंही भान तरुणाईने ठेवले पाहिजे. कोण व्यापारी होते. सधन शेतकरी होते, उद्योगपती होते, शासकीय, निमशासकीय नोकरदार आहेत. त्यामुळे त्यांना आपण मदत करून त्यांच्याबरोबर सेल्फी काढून आपण लय मोठे सामाजिक काम केलं आहे. हे कोणी समजू नये. फक्‍त तरुणाईने संयम राखावा, सोशल मीडियावर एखादी पोस्ट टाकताना सामाजिक भान ठेवून पोस्ट कराव्यात, एवढीच माफक अपेक्षा.

Leave A Reply

Your email address will not be published.