48,500 रुपये वसूल करत रस्ताही घेतला धुवून : कोथरूड क्षेत्रीय कार्यालयाची कारवाई
पुणे – थुंकीबहाद्दरांना आणि अस्वच्छता करणाऱ्या नागरिकांवर कोथरूड क्षेत्रीय कार्यालयाने दंडात्मक कारवाई करून 48 हजार 500 रुपये वसूल करण्यात आले. एवढेच नव्हे तर थुंकणाऱ्यांकडून रस्ता धुवून घेण्यात आला.
सदर दंडात्मक कारवाई व जनजागृती मोहीम महापालिका सहाय्यक आयुक्त शिशीर बहुलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ आरोग्य निरीक्षक राम सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली आरोग्य निरीक्षक सचिन लोहकरे, महेश लकारे, संतोष ताटकर, गणेश साठे, वैभव घटकांबळे, नवनाथ मोकाशी, सतीश बनसोडे, प्रमोद चव्हाण यांच्या निरीक्षणाखाली मोकादम वैजीनाथ गायकवाड, अण्णा ढावरे, अशोक खुडे, अशोक कांबळे, साईनाथ तेलंगी यांनी दंडात्मक कारवाईची मोहीम राबवण्यात आली. तसेच मोहीम सातत्याने राबवली जाईल, असे वरिष्ठ आरोग्य निरीक्षक राम सोनवणे यांनी सांगितले.
कोथरूड उपनगरात अस्वच्छता करणाऱ्या 128 नागरिकांवर कारवाई करून 44,300 रु. प्रशासकीय शुल्क वसूल करण्यात आले. सार्वजनिक ठिकाणी थुंकून अस्वच्छता करणाऱ्या एकूण 28 थुंकी सम्राटावर 4,200 रु. असे एकूण 48,500 रुपये दंडात्मक कारवाई करण्यात आली.
अस्वच्छता करणाऱ्या नागरिकांवर करडी नजर
स्वच्छ भारत अभियान आणि स्वच्छ सर्वेक्षण मिशन-2020 अंतर्गत कोथरूड बावधन क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीने स्वच्छ सर्वेक्षणच्या पूर्वसंध्येला क्रमांक 10,11,12 मध्ये आरोग्य विभागाच्या वतीने प्रत्येक आरोग्य कोठी अंतर्गत एक आरोग्य निरीक्षक आणि मुकादमासह दोन सेवक चार कर्मचाऱ्यांचे एक पथक असे एकूण 13 पथके तयार करून शहर अस्वच्छ करणाऱ्या नागरिकांवर करडी नजर ठेवून दंडात्मक कारवाई करण्यास सज्ज झाली आहे.
राबविली जातेय जनजागृती मोहीम
पुणे महापालिकेला स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत देशात एक नंबर मानांकन मिळविण्यासाठी आणि स्वच्छ सर्वेक्षणात नागरिकांचा 100 टक्के सहभाग वाढवण्यासाठी कंबर कसली आहे. स्वच्छतेविषयी जनजागृती तसेच महापालिकेच्या प्रशासनाविषयी आदरयुक्त भीती निर्माण व्हावी, मुंबई प्रांतिक अधिनियम 1949 अन्वये स्वच्छतेविषयीच्या कलम आणि नियमांचे उल्लंघन होऊ नये म्हणून या पथकाद्वारे जनजागृती मोहीम राबविली जात आहे.