पालिकेकडून कारवाईसाठी भरारी पथक स्थापन
पुणे – करोनाच्या पार्श्वभूमीवर थुंकी बहाद्दरांवर कारवाई करण्यासाठी महापालिकेकडून भरारी पथकांची स्थापना करण्यात येणार आहे. या पथकाच्या माध्यमातून रस्त्यांवर, सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांवर कारवाई करून जागेवरच एक हजार दंड वसूल करण्यात येणार आहे.
करोना संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता नागरिक अद्याप गंभीर नसल्याचे दिसून येत आहे. सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, तोंडावर मास्क न बांधणे, फिजिकल डिस्टन्सिंग न ठेवणे असे प्रकार होत आहेत. अशा लोकांवर कारवाईचा विचार महापालिका करत आहे. याची अंमलबजावणी या आठवडाभरात होणार असल्याची माहिती अतिक्रमण विभाग प्रमुख माधव जगताप यांनी दिली.
1000 दंड आणि समाजसेवाही…
करोनाचा संसर्ग थुंकीतून होत असल्याने सार्वजनिक ठिकाणी थुंकणे आणि धूम्रपान करणाऱ्यांना आता जबर दंड भरावा लागणार आहे. ही कारवाई महापालिकेच्या आरोग्य निरीक्षकांमार्फत केली जाणार आहे. तरतुदीनुसार एक हजार रुपये दंड आणि एक दिवस समाजसेवा करावी लागणार आहे. यापूर्वी हा दंड 150 रुपये होता.