बेल्हे :- राजुरी (ता.जुन्नर) येथे भरधाव वेगाने जाणाऱ्या डंपर चालकाने दिलेल्या जोरदार धडकेत सायकलस्वार जागीच ठार झाला. हा अपघात शुक्रवार (दि.२७) सकाळी साडेनऊच्या सुमारास राजुरी उंचखडक रोडवरील कॅनॉल जवळ घडला. भरधाव वेगाने जाणाऱ्या डंपर चालकाने चिरडल्याने वयोवृद्ध सायकलस्वाराचा जागीच मृत्यू झाला.
लक्ष्मण शिवराम हाडवळे (वय ७५ रा. उंचखडक, राजुरी) असे या अपघातामध्ये मृत्यूमुखी पडलेल्या सायकलस्वाराचे नाव आहे. या दुर्दैवी अपघाताने राजुरी व परिसरातील गावावर शोककळा पसरली आहे.
या बाबत पोलिसांनी सांगितलेली महिती अशी की, लक्ष्मण हाडवळे उंचखडक येथून राजुरी गावात दशक्रियासाठी शुक्रवारी गेले होते. दशक्रिया उरकल्यानंतर सायकलवरून उंचखडक येथे परत येत असताना साडेनऊच्या सुमारास राजुरी उंचखडक रोडवरील कॅनॉल जवळ त्यांच्या सायकलला एम.एच 14 एचजी 5777 क्रमांकाच्या डंपरने जोराची धडक दिली.
यामुळे सायकलस्वाराचा तोल जाऊन डंपरच्या चाकाखाली आला. डंपरचे चाक त्याच्या अंगावरून गेल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. महेश ज्ञानदेव कणसे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून डंपर चालक गणेश दत्तात्रय हाडवळे याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास आळेफाटा पोलीस करीत आहे.