#व्यक्‍तिमत्त्व: भीतीच्या पलीकडची गती 

सागर ननावरे 
भीती एक अशी मानसिकता आहे जी मनात एक दडपणाची भावना निर्माण करते. भीती वाटणे, घाबरणे हा माणसाचा गुणधर्मच आहे. आयुष्यात बऱ्याच गोष्टी करण्यापूर्वी आपल्या मनात भीतीची भावना निर्माण होत असते. अनेकदा आपण काल्पनिक भीतीने स्वतःचा थरकाप करून घेत असतो. तर काही वेळेस केवळ लोकांनी निर्माण केलेल्या समजामुळे भीती निर्माण होत असते.
असो, व्यक्‍तिमत्त्व विकासात भीतीवर मात करणे अतिशय गरजेचे असते. म्हणजेच यश संपादन करण्यासाठी भीतीवर विजय हा हवाच असतो.टेलिव्हिजनवर एक जाहिरात लागते आणि त्यातील तो डायलॉग आपल्याही ओठांवर रेंगाळत असतो. आणि तो डायलॉग म्हणजे “डर के आगे जीत है.” खरं तर हा फक्त डायलॉगच नाही तर हे वास्तववादी सत्य आहे. भीतीवर मात केल्यास मात्र आपल्याला अपेक्षित असणारी गोष्ट सहज साध्य होत असते.
माझेही भीतीबाबत एक मत आहे आणि ते म्हणजे “भीती च्या पलीकडे गती असते’ जोपर्यंत आपण भीतीच्या अडथळ्यांवर मात करीत नाही, तोपर्यंत आपल्याला त्या गोष्टीत यशप्राप्ती होत नाही.
मला आठवतं मी चौथीत असताना माझ्या मामाने मला एक रेंजर सायकल गिफ्ट केली होती. सायकल मिळाल्याचा आनंद मला होताच, पण सायकल चालवायला येत नसल्याची खंतही होतीच. मी मित्रपरिवाराला मोठ्या अभिमानाने नवीन सायकल घेतल्याचे सांगून ठेंगा दाखवायचो. परंतु ‘तुला तर सायकल येत नाही, मग ही सायकल काय तुझे पप्पा चालविणार का? म्हणून सर्वजण माझी टर उडवायचे.
शेवटी मी मनाशी खुणगाठ बांधली की, आता सायकल शिकायची आणि मित्रांना दाखवूनच द्यायचे. मी सायकल
चालविण्याचा प्रयत्न केला दोन तीन वेळा थोडे खरचटलेसुद्धा. एके दिवशी मी सायकलवरून असा काही पडलो, की मला चांगलीच दुखापत झाली. त्या दिवसापासून मी सायकल शिकण्याची मनीषा सोडून दिली.
दीड दोन महिने उलटून गेले तरी नवी कोरी सायकल दारातच पडून होती. ही गोष्ट माझ्या वडिलांच्या लक्षात आली आणि त्यांनी मला सायकल शिकविण्याचे ठरविले.
एका मैदानात नेऊन मागे सायकलला पकडून ते मला सायकल चालायला शिकवित होते. परंतु त्यांनी हात काढताच माझे दोन्ही पाय जमिनीवर येऊन मी जागीच थांबत असे. त्यांनी मला सांगितले,” हे बघ बाळा तू तुझ्या मनातील भीती पहिली काढून टाक. कारण या भीतीमुळे तुला फक्‍त इतरांच्या सायकल वर मागे बसण्यातच धन्यता मानावी लागेल. म्हणूनच तू घाबरू नको कदाचित तू धडपडशील, तुला लागेल पण त्यातूनच पुढे तुझी भीती जाईल आणि तू सायकल चालवू शकशील.” मला वडिलांचे म्हणणे पटले. मी प्रयत्न करू लागलो. काही वेळा मला किरकोळ खरचटले. परंतु मी प्रयत्न करीत राहिलो. माझी भीती हळू हळू कमी झाली. सायकल चालवू लागलो. मित्रांनो सायकल चालविण्याच्या या प्रसंगातूनच मला हे उमगले, की ‘भीती च्या पुढे गती असते’.
तसे पाहता ‘भीती च्या पुढे गती असते’ ही गोष्ट आपल्याला प्रत्येक बाबतीत लागू पडत असते. कोणाला बोलण्याची भीती, कोणाला रागविण्याची भीती, कोणाला अपयशाची भीती तर कोणाला निर्णय घेण्याची भीती. अशा अनेक भीती यशाच्या अडसर येत असतात. परंतु आपण जर या भीतीला शरण जाऊन त्या गोष्टीकडे दुर्लक्ष केल्यास मात्र आपण भीतीच्या सवयीचे गुलाम बनतो. आपला आत्मविश्‍वास खालावला जातो. परिणामी नकारात्मकता वाढत जाते. आणि नकारात्मक विचारसरणी असलेली व्यक्‍ती यशापासून नेहमीच दूर लोटली जाते.
अमेरिका खंड शोधणारा ख्रिस्तोफर कोलंबस आपल्याला माहीतच आहे. त्याने आपल्या समुद्रभ्रमणाने अनेक प्रदेशांचा शोध लावला. कोलंबसपूर्वी अनेक नाविकांनी समुद्रभ्रमण करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु जमीन नजरेस येईल इतकेच अंतर ते पार करू शकत होते. कारण त्यांच्या मनात जमिनीशी संपर्क तुटून समुद्रात भरकटल्यास आपले काय होईल याबाबत भीती होती. परंतु कोलंबसने या भीतीवर मात करत गती घेतली आणि त्यातून अनेक खंड ,प्रदेशांचा आणि सागरी मार्गांचा शोध लावला.
मित्रहो भीती वाटण्यात काहीही गैर नाही. मात्र भीतीच्या आहारी जाऊन आत्मविश्‍वास गमावण्यासारखी मोठी चूक नाही. म्हणूनच आपल्या यशात आणि जीवनात आपल्याला भीतीवर मात करायची असेल, तर ज्या गोष्टीची भीती वाटते तीच गोष्ट वारंवार करावी. यातूनच पुढे भीती जाऊन आपल्या जीवनाला गती प्राप्त होत असते.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)