मुंबई: शिवसेना आणि भाजपा यांच्यातील दुराव्यात चांगलीच दरी निर्माण झाले असल्याचे स्पष्ट करण्यात येत आहे. त्यातच आता राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मारकाच्या भूमिपूजनाचं आमंत्रण न दिल्याचं समोर आलं आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतानाच ठाकरे स्मारकाची घोषणा झाली होती. स्मारकासाठी अनेक परवानग्या देखील त्यांच्याच कार्यकाळात मिळाल्या. फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन या स्मारकाची घोषणा केली होती. त्यानंतर कागद हस्तांतरण कार्यक्रम पार पडला होता, मात्र आता या स्मारकाचं भूमिपूजन होत असताना देवेंद्र फडणवीस यांना कार्यक्रमापासून दूर ठेवण्यात आलं आहे. यावरून आता भाजपाने शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.
“सोडलेल्या हिंदुत्वाचे आणि कोत्या मनाचे पुन्हा एकदा दर्शन, फक्त आयत्या पिठावर रेघोटया मारणाऱ्यांची नावं” असं म्हणत भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी हल्लाबोल केला आहे. भातखळकर यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. “सोडलेल्या हिंदुत्वाचे आणि कोत्या मनाचे पुन्हा एकदा दर्शन… निमंत्रण पत्रिकेतून ‘हिंदुहृदयसम्राट’ गायब, MMRDA चे मंत्री एकनाथ शिंदे गायब, ज्यांच्यामुळे शिवसेनाप्रमुखांचे स्मारक शक्य झाले ते विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस गायब… नावे फक्त आयत्या पिठावर रेघोटया मारणाऱ्यांची” असं म्हणत ठाकरे सरकारवर अतुल भातखळकर यांनी जोरदार टीका केली आहे.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचं भूमिपूजन आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत होणार आहे. सायंकाळी साडेपाच वाजता महापौर निवास, दादर, येथे हा कार्यक्रम होईल. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी संबंधातील बंधने लक्षात घेऊन मोजक्या उपस्थितांसह भूमिपूजन समारंभ होणार असून त्याचे ऑनलाईन थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे.