तीन हजार बुलेटच्या आवाजाला चाप

  • वाहतूक पोलिसांनी वसूल केला 29 लाख 70 हजारांचा दंड

पिंपरी – बुलेटचा सायलन्सर बदलणाऱ्यांवर कारवाईचे आदेश पोलीस आयुक्‍तांनी दिले. त्यानुसार वाहतूक पोलिसांनी कारवाईला सुरवात केली. गेल्या चार महिन्यात वाहतूक पोलिसांनी दोन हजार 970 बुलेटस्वारांवर कारवाई करीत 29 लाख 70 हजारांचा दंड वसूल केला.

पोलीस आयुक्‍त कृष्ण प्रकाश यांनी सायलेन्सर बदलून प्रदूषण करणाऱ्या बुलेटस्वारांवर कडक कारवाईचे आदेश दिले होते. तसेच बुलेटचा सायलन्सर बदलणाऱ्यांवरही कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार 18 ऑक्‍टोबर 2020 पासून वाहतूक पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली. वाहनात कोणताही बदल केल्यास त्या वाहन चालकाला एक हजारांचा दंड आकारण्यात येतो. त्यानुसार पहिल्या 25 दिवसांमध्ये 908 बुलेटस्वारांवर कारवाई केली. त्यानंतरही वाहतूक पोलिसांनी कारवाईचा धडाका सुरूच ठेवला आत्तापर्यंत दोन हजार 970 जणांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई केल्याची नोंद आहे.

वाहतूक पोलिसांनी केवळ बुलेटस्वारांवरच कारवाई केली नाही तर अवैधरित्या सायलन्सर विक्री करणारे दुकानदार आणि सायलन्सर बदलून देणारे गॅरेजवाले यांनाही नोटीस बजावली. जर बेकायदेशीररित्या सायलेन्सर विक्री किंवा बदलताना आढळल्यास कायदेशीर कारवाईचा इशाराही या नोटीसमध्ये देण्यात आला होता. एवढेच नव्हे तर पोलिसांनी दुकाने आणि गॅरेजमध्ये जाऊन याबाबतची खात्रीही केली. तसेच बुलेटस्वारांवरील कारवाई यापुढील काळातही सुरू राहणार असल्याचे वाहतूक पोलिसांनी सांगितले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.