हवेलीतील “ढोल’चा आवाज घुमतोय…

जिल्ह्यातील गणेशोत्सव मंडळांकडून मिळाल्या खेळांच्या सुपाऱ्या

उरुळीकांचन – हवेली तालुक्‍यातील ढोल-झांजपथकांना जिल्ह्यातून मागणी वाढत आहे. हवेलीतील ग्रामीण भागातील ढोलचा आवाज आता जिल्हाभर घुमत आहे. पूर्व हवेलीच्या ग्रामीण भागातील निम्यापेक्षा अधिक ढोल पथकांना यावर्षी तालुक्‍याबाहेरच्या सुपाऱ्याही मिळाल्या असल्याचे सांगण्यात आले.

हवेली तालुक्‍यातील पूर्व भागातील फुरसुंगी, उरूळीदेवाची, लोणीकाळभोर, सोरतापवाडी, कुंजीरवाडी, आव्हाळवाडी यासह अन्य गावांतील ढोल-झांज पथकांना दौंड, पुरंदर, बारामती येथील गणेश मिरवणुकीच्या सुपाऱ्या मिळाल्या आहेत. पुणे ढोल हा एक वेगळ्या ठेक्‍यामुळे महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. नाशिक ढोल प्रमाणेच पुणे ढोलचे वैशिष्ठ्य आहे. पुणे शहराप्रमाणेच पूर्व हवेलीतील भागातही तरूणांची ढोल-झांज पथकांची पथके गेल्या काही वर्षांत नावारूपास आली आहेत. विशेष म्हणजे या पथकांना पुणे शहराबरोबच जिल्ह्यातूनही मागणी आहे.

ढोल पथकांचा तासाला दर 30 ते 50 हजार रुपये एवढा आहे. पुणे शहर तसेच मुंबईत हाच दर एक लाखाच्या सुपारीवरही जातो. याव्यतिरिक्त बक्षिसे म्हणून 5 हजार ते 15 हजार रुपयेही मिळत असतात, अशी माहिती उरूळीकांचनच्या झांज पथकांचे शिक्षक वल्लभ शिंदे यांनी दिली.

ग्रामीण भागातील ढोल पथकांत ढोल, ताशा, झांज आदी वाद्यांचा समावेश असतो. खेळ खेळताना झांज पथकात वेगवेगळे नृत्यप्रकार सादर केले जातात. यामध्ये प्रामुख्याने शेतकरी-बैलजोडी, क्रिकेट, कबड्डी यांचाही समावेश असतो. त्यामुळे असे खेळ पाहण्यासाठी व ठेक्‍यावर नाचण्यासाठी मंडळांकडून मागणी वाढत आहे. हवेली तालुक्‍यातील काही मंडळे गणेशोत्सवाच्या अखेरच्या टप्यात तर विविध गावांत मुक्कामीच असतात. पथकांच्या माध्यमातून पैसे मिळत असले तरी गावातील तरणांत एकोपा टिकून राहणे, हा उद्देश यामागे असतो. या माध्यमातून एकत्र होणारा निधी गावातील विधायक कामांकरीता दिला जातो, अशा निधीतून गावातील व्यायाम शाळा, मंदीर, रस्ते, शाळा वर्ग बांधण्यासाठी रक्कम दिली जात असते. यावर्षी जमा होत असलेली रक्कम सांगली, कोल्हापुरातील पुरग्रस्त गावांतील सुधारणा कामांसाठी दिली जाणार असल्याचे येथील ढोल पथकांकडून सांगण्यात आले.

डीजे सिस्टीमवरील बंदीमुळे मागणी….
शहरातसह ग्रामीण भागातील गणेश मंडळांवर डीजे लावण्यावर बंद घालण्यात आली आहे. याबाबत पोलीसांनी बैठका घेऊन कारवाई संदर्भातील सूचनाही दिल्या आहेत. याच करणातून गणेश मंडळ पारंपरिक वाद्यांकडे म्हणजेच ढोल, झांज पथकांकडे वळली आहेत. यातून ग्रामीण भागातील अशा पथकांना गणशोत्सवात मोठी मागणी असून यातील उलाढालही गेल्या काही वर्षात वाढते आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×