पुणे – मुठा नदीला आलेल्या पुरामुळे नदीपात्रातील ढोल-ताशांच्या पथकांचा सराव करण्यासाठी उभारलेले सात ते आठ पत्र्याचे शेड वाहून गेले होते. सध्या या शेडची नव्याने उभारणी करण्याची लगबग सुरू झाली आहे. यामुळे, गणेशोत्सवाच्या तोंडावर पुन्हा एकदा ढोल-ताशा पथकांचा सराव सुरू होणार आहे.
दरवर्षी गणेशोत्सवाच्या काळात ढोल-ताशा पथके मोठ्या जल्लोषात मिरवणुकीत सहभागी होतात. गणेशोत्सवाच्या आधी महिनाभर या पथकांचा सराव नदीपात्रातील मोकळ्या जागेत पत्र्यांची शेड उभी करुन केला जातो. मात्र, यंदा खडकवासला धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग केल्याने नदीपात्राची पाणी पातळी वाढली होती. यामुळे, सुमारे सात ते आठ ढोल-ताशा मंडळांचे पत्र्याचे शेड वाहून गेले होते. या पुरात शेडची पत्रे, लाकडी बांबूचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. यामुळे, गेल्या पंधरा दिवसांपासून पथकांचा सराव बंद होता. आता नव्याने शेड उभे करण्याचे काम सुरू झाले आहे.