पाटणा – ध्वनी प्रदूषणाचा मानवी आरोग्यावर विपरीत परिणाम होतो, याबाबत आपण अनेकदा ऐकले असेल. पण ध्वनी प्रदूषणामुळे एखाद्याचा मृत्यू होऊही शकतो. बिहारच्या सीतामढी याठिकाणी अशीच एक घटना घडली आहे. डीजेचा मोठा आवाज नवऱ्या मुलाच्या मृत्यूचे कारण ठरला आहे.
नवरदेवाला वरमाला घालतेवेळी स्टेजवरच अस्वस्थ वाटू लागले आणि नंतर तो बेशुद्ध पडला. त्याला दवाखान्यात नेईपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर वधू-वराच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे. अधिक माहितीनुसार, याठिकाणी डीजेवर बंदी आहे. तरीही मोठ्या आवाजात डीजे वाजवला जात होता.
सुरेंद्र कुमार (30) असे मृताचे नाव आहे. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे नंतर डॉक्टरांनी सांगितले आहे. सोनबरसा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील इंदरवा गावातील ही घटना आहे. नवऱ्या मुलाने अनेकदा डीजे बंद करण्यास सांगितले. मात्र, लोकांच्या निष्काळजीपणामुळे जयमाल संपताच नवरदेव अचानक स्टेजवर बेशुद्ध पडला.
या घटनेनंतर नातेवाइकांनी त्यांना खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्यांची प्रकृती ढासळू लागली. यानंतर त्यांना सदर रुग्णालयात रेफर करण्यात आले. वाटेतच त्याचा मृत्यू झाला. सुरेंद्रच्या सांगण्यावरून डीजे बंद केला असता तर कदाचित ही घटना घडली नसती, असे स्थानिक लोक वारंवार सांगत होते.