‘सोनखताचा प्रकल्प’ नियोजनाअभावी बारगळला

अधिकाऱ्यांमधील उदासीनता कारणीभूत : घोषणा राहिली कागदोपत्रीच

पुणे – जिल्ह्यातील खेड तालुक्‍यातील मारोशी गावात प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात येणारा “सोनखताचा प्रकल्प’ नियोजनाअभावी सुरूच झाला नाही. सोनखतामुळे नापीक जमीन सुपीक होण्यास मदत होते. त्यामुळे “हा प्रकल्प शेतकऱ्यांसाठी फायद्याचा आहे’, “त्यासाठी आवश्‍यक निधीही उपलब्ध आहे’, “मशीन येताच प्रकल्प सुरू’ अशी दवंडी पेटवली खरी मात्र, अधिकाऱ्यांमधील उदासीनता, “मी करायचे का त्यांनी’ यामध्येच “सोन्यासारखा’ हा प्रकल्प उभा राहण्याअधीच “बारगळला’.

तत्कालिन मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी या सोनखताच्या प्रकल्पाची घोषणा केली. त्यासाठी जिल्हा नियोजन समिती (डीपीडीसी) कडून सहा लाखांचा निधी देखील मंजूर करण्यात आल्याचे सांगितले. या निधीतून तांत्रिक विद्यापीठाकडून मशीनची ऑर्डर देण्यात आली. तर दुसरीकडे या कामासाठी बचतगटाची देखील नियुक्ती करण्यात आली होती. त्यामुळे लोणची, पापड बनवणाऱ्या बचत गटामार्फत ग्रामीण भागातील महिला आता सोनखत निर्मिती करण्याचे सांगण्यात येत होते.

मात्र, केवळ प्रसिद्धीचे पुराण संपल्यानंतर प्रत्यक्षात ही घोषणा कागदोपत्रीच राहिली असे दिसते. कारण, मागील वर्षभरात या प्रकल्पासाठी आवश्‍यक असणारे शेड उभारण्यात आले नाही. तर सोनखतासाठी मागविण्यात आलेली मशीनही अद्याप मिळाली नाही. दरम्यान, हा प्रकल्प तालुकास्तरावर राबवत असल्याचे सांगण्यात येत आहे, तर मशीनसाठी आम्ही पाठपुरवा घेतला, मात्र मशीन अद्याप उपलब्ध झाले नसल्याचे पाणी व स्वच्छता विभागाकडून सांगण्यात आले.

दरम्यान, राजगुरूनगर येथील संशोधन केंद्रात सोनखतासंदर्भात संशोधन करण्यात आले आहे. जिल्ह्यात रासायनिक खतांचा वापर वाढल्यामुळे शेती पिकांचा दर्जा देखील ढासळत असल्याने, उत्पन्नाचा विचार करून सोनखताच्या प्रकल्पाचा विचार करण्यात आला आहे. चांगल्या उत्पन्नासाठी सोनखताचा योग्य पर्याय उपलब्ध करून दिला जाणार असल्याचे जिल्हा परिषदेकडून सांगण्यात आले.

या प्रकल्पासाठी आमदार निधीतून शेड उभारण्यात येणार होते. मात्र, शेड उभारण्यात आलेला नाही. याशिवाय सोनखतासाठी प्रक्रिया मशीन आवश्‍यक होती. ती तांत्रिक विद्यापीठाकडून मागवण्यात आली होती. त्यांच्याकडे वारंवार पाठपुरावा केला आहे. ;परंतु त्यांच्याकडून मशीन अद्याप उपलब्ध झालेले नाही.
– अमर माने, उपमुख्यकार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद

Leave A Reply

Your email address will not be published.