केडगाव : चौफुला (ता. दौंड) येथे दोन दिवसांपुर्वी मयत झालेल्या एका व्यक्तीचा मुलगा करोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले आहे, त्यामुळे येथील नागरिकांची धाकधूक वाढली आहे.
मागील आठवड्यात येथील एक व्यक्ती खोकला, ताप आजाराबाबत खासगी दवाखान्यात उपचार घेतले परंतु त्याची करोना तपासणी झाली नव्हती, दोन दिवसांपुर्वी त्या व्यक्तीचे निधन झाले. त्याचा अंत्यविधीला परिसरातील सुमारे 200 लोक उपस्थित होते. त्या व्यक्तीची लक्षणे करोना सदृश दिसुन आल्याने गावचे पोलिस पाटील अविनाश शेंडगे अणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अंत्यविधी सामजिक अंतर राखून पार पाडला.
दरम्यान, आरोग्य विभागाने मयत व्यक्तीच्या घरातील पाच व्यक्तींच्या घशाचे नमुने तपासणीसाठी घेतले होते, त्यांचा अहवाल प्राप्त झाला असुन मयत व्यक्तीच्या सोळा वर्षीय मुलाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अशोक रासगे यांनी दिली. यामुळे केडगाव, वरवंड, पाटस पाठोपाठ चौफुलाकरांची धाकधूक आता वाढली आहे.