आठ वर्षीय बालकाला कोरोनाची लागण; नागरिक भयभीत
शिक्रापूर(प्रतिनिधी) : शिक्रापूर ता. शिरूर येथे मागील आठवड्यात रांजणगाव गणपती येथील एका कंपनीत कामाला जाणारा कंपनी कामगार कोरोना बाधित झाला असल्याचे समोर आले असताना आरोग्य विभागाने त्या कामगाराच्या घरातील चार जणांचे स्वॅब तपासणी साठी नेले असताना त्यातील कामगाराच्या आठ वर्षाच्या मुलाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती शिरूर तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र शिंदे यांनी दिली आहे.
शिक्रापूर ता. शिरूर येथील मलठण फाटा परिसरात राहणारा चाळीस वर्षीय इसम हा रांजणगाव गणपती येथे एका कंपनीमध्ये कामाला असून त्याला २१ जून रोजी सर्दी, खोकला, तापाचा त्रास होऊ लागल्याने तो शिक्रापूर येथील ग्रामीण रुग्णालयमध्ये उपचारासाठी गेला होता. तेथे त्याची तपासणी करून खबरदारी म्हणून त्याला पुढील उपचारासाठी पुणे येथील शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले होते. पुणे येथे त्याची कोरोना तपासणी केली असता त्याचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता.
खबरदारी म्हणून त्यानंतर आरोग्य पर्यवेक्षक जालिंदर मारणे, आरोग्य सेवक एस. एस. चोपडा यांसह आदींनी सदर रुग्णाच्या घरा जवळील सर्व परिसरात ग्रामपंचायतच्या वतीने औषध फवारणी करत निर्जंतुकीकरण केले होते. आरोग्य विभागाच्या वतीने सदर कामगाराचे आई, वडील, पत्नी व दोन लहान मुलांचे स्वॅब तपासणी साठी घेण्यात आले होते. त्यापैकी सदर कामगाराच्या घरातील चार जणांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आले असून आठ वर्षीय बालकाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
दरम्यान, काही दिवस कोरोना पासून मुक्ती मिळाल्याने शिक्रापूर व परिसरातील नागरिक समाधानी असताना आता पुन्हा कोरोना बाधित रुग्ण आढळून येऊ लागले असून आता लहान लहान बालकांना कोरोनाची लागण होत असल्यामुळे शिक्रापूर सह परिसर हादरून गेला आहे. तर सदर इसम राहत असलेल्या परिसरातील नागरिक भयभीत झाले आहे. नागरिकांनी योग्य खबरदारी घेणे गरजेचे असल्याचे आरोग्य विभागाच्या वतीने सांगण्यात आले आहे.