पवनानगर -दारूच्या नशेत पोटच्या मुलानेच बापाचा खून केल्याची धक्कादायक घटना मावळ तालुक्यातील जवण नं. 3 येथे घडली. ही घटना गुरुवार (दि. 14) रोजी घडली. रविवार (दि. 17) रोजी घरातून दुर्गंधीयुक्त वास आल्याने नागरिकांनी लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्याला माहिती दिल्याने ही घटना उघडकीस आली. दरम्यान आरोपीने खून करून पलायन केले होते. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.
खंडू उर्फ गोट्या भिकाजी गिरंजे (रा. जवण नं.3, पवनानगर, ता. मावळ) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर शेखर खंडू गिरंजे (वय 35, सध्या रा. खडकपाडा बारवेगाव, शिवपाडा, ता. कल्याण पश्चिम, जि. ठाणे) असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी मयत यांचा भाऊ सखाराम भिकाजी गिरंजे यांनी लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
मयत खंडू गिरंजे व शेखर गिरंजे यांच्यामध्ये दारूच्या नशेत वाद झाला. तो वाद विकोपाला जात मुलगा शेखर याने आपले वडील खंडू यांचा गळा दाबून खून केला. त्यानंतर तेथून पलायन केले. हा प्रकार गुरुवार (दि. 14) रोजी घडला. त्यानंतर रविवार (दि. 17) रोजी त्यांच्या घरातून दुर्गंधीयुक्त वास आल्याने नागरिकांनी धाव घेतली. घराचा दरवाजा उघडला असता खून झाल्याचे उघडकीस आले.