न्यूयॉर्क : जगात करोनाने सर्वत्र धुमाकूळ घातला आहे. त्यात समाधानकारक म्हणजे लसीकरणाला सध्या वेग येत आहे. त्यामुळे आता करोनाला रोखण्यात काही देशांना यश आले आहे. दरम्यान, युरोपियन ड्रग रेग्युलेटरने युरोपियन युनियमधील देशांतील 12 ते 15 वयोगटातील बालकांना फायझरची लस देण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे आता या वयोगटातील बालकांच्या लसीकरणासाठी लवकरच सुरुवात होणार आहे.
एका इंग्रजी वर्तमानपत्राच्या माहितीनुसार , जर्मनीने आपल्या देशात जूनपासून या वयोगटातील बालकांचे लसीकरण सुरु होणार असल्याचे जाहीर केले आहे. फायझर कंपनीने 12 ते 15 वयोगटातील बालकांवर आपल्या लसीच्या उपयुक्ततेचा अभ्यास गेल्या महिन्यापूर्वीच केला आहे. त्यामध्ये ही लस बालकांवरही प्रभावी आणि सुरक्षित असल्याचा दावा फायझरच्या वतीने करण्यात आला आहे.
अमेरिकेतील 12 वर्षावरील बालकांना फायझरची करोना लस देण्यास अन्न आणि औषधं प्रशासनाकडून मंजुरी मिळाली आहे. अमेरिकेच्या लसीकरणाच्या कार्यक्रमातील आणि करोना विरोधातल्या लढ्यातील हा एक महत्वाचा निर्णय आहे.
भारतात करोनाची तिसरी लाट येणार असून त्यामध्ये लहान मुलांना जास्त धोका आहे अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर ‘कोवॅक्सिन’ लसीच्या 2 ते 18 वर्ष वयोगटातील फेज दोन आणि तीनच्या क्लिनिकल ट्रायलला ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने (डीसीजीआय) मान्यता दिली आहे.
भारतातील करोनाच्या लसींचा सध्या मोठ्या प्रमाणावर तुटवडा असल्याचे पहायला मिळत आहे. त्यातच 18 वर्षाखालील मुलांना कोरोनाची लस देण्यात यावी अशा आशयाची याचिका दिल्ली उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे आता या वयोगटातील मुलांना करोनाची लस कधी मिळते हे पाहणे गरजेचे आहे.