स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; आणखी दोघांचा शोध सुरू
नगर – कर्जतमधील उपकारागृहातून पळालेल्या पाच कुख्यात आरोपींपैकी पोलिसांनी तिघांच्या मुसक्या आवळल्या. स्थानिक गुन्हे शाखेने दोन आरोपींना तर कर्जत पोलिसांनी एका आरोपीस जेरबंद केले. वडगाव मावळ व इंदापूर परिसरात (जि. पुणे) पोलिसांनी ही कारवाई केली.
ज्ञानेश्वर तुकाराम कोल्हे, मोहन कुंडलिक भोरे, गंगाधर लक्ष्मण जगताप अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. दरम्यान, कारागृहातून पळून गेल्यानंतर आरोपींनी पिंपळवाडी गावातील ऊस तोडणीसाठी आलेल्या कामगारांची मोटारसायकल चोरून नेल्याची कबुली आरोपींनी पोलिसांना दिली.
कर्जत येथील उपकारागृहाच्या कोठडी क्रमांक 4 मधून ज्ञानेश्वर तुकाराम कोल्हे (रा. जवळा, ता. जामखेड), मोहन कुंडलिक भोरे (रा. कवडगाव, ता. जामखेड), अक्षय रामदास राऊत (रा. पारेवाडी, ता. जामखेड), चंद्रकांत महादेव राऊत (रा. पारेवाडी. ता. जामखेड), गंगाधर लक्ष्मण जगताप (रा.म्हाळंगी, ता. कर्जत) या पाच कुख्यात आरोपींनी रविवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास पलायन केले होते.
पळून जाण्यासाठी त्यांनी कोठडीच्या छताचा प्लायवूडचा भाग कटरच्या सहाय्याने कापून वर असलेले जाड लोखंडी गज कापून कौले काढली. शेजारी असलेल्या भिंतीवरून उड्या टाकून ते पळून गेले होते. याबाबत सोमवारी नाशिकपरिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक छेरींग दोरजे, प्रभारी जिल्हा पोलीस अधीक्षक सागर पाटील यांनी भेट देऊन कारागृहाची पाहणी केली होती. आरोपींच्या शोधासाठी पोलिसांनी सात वेगवेगळी पथके रवाना केली होती.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि संदीप पाटील, शिरीश देशमुख, पोसई गणेश इंगळे या अधिकाऱ्यांची चार पथके रवाना करण्यात आली होती. आरोपी ज्ञानेश्वर कोल्हे, मोहन भोरे हे शिक्रापूर- चाकण रस्त्याने वडगाव मावळच्या दिशेने मोटारसायकलवरून जाताना दिसल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलीस पथक वडगाव मावळ येथे गेले. तसेच पुणे ग्रामीणच्या पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली. आरोपी मोहन भोरे याचा भाऊ राहत असलेल्या इमारतीच्या आजूबाजूने पोलिसांनी कोम्बिग ऑपरेशन करून ज्ञानेश्वर तुकाराम कोल्हे व मोहन कुंडलिक भोर यांना मोटारसायकलसह ताब्यात घेतले.
तसेच तिसरा आरोपी गंगाधर लक्ष्मण जगताप यास न्हावी (ता. इंदापूर, जि. पुणे) येथे अटक करण्यात आली. ही कारवाई कर्जत उपविभागाचे पोलीस उपअधीक्षक संजय सातव स्थानिक गुन्हे शाखेचे दिलीप पवार, संदीप पाटील, शिषीरकूमार देशमुख, गणेश इंगळे, मोहन गाजरे, सोन्याबापू नानेकर, दत्ता हींगडे, विजय वेठेकर, मन्सूर सय्यद, बाळासाहेब मूळीक, दत्तात्रय गव्हाणे, विशाल दळवी, विश्वास बेरड, रविंद्र कर्डीले, सागर गवांदे, रवि सोनटक्के, संदीप दरंदले, रणजित जाधव, आण्णा पवार, संदीप पवार, प्रकाश वाघ, दिनेश मोरे, सचिन आडबल, मच्छिंद्र बर्डे, दीपक शिंदे, राहूल सोळंके, रोहीत मिसाळ, भागीनाथ पंचमूख, बाळासाहेब भोपळे, बबन बेरड, संभाजी कोतकर, देविदास काळे यांच्या पथकाने केली.