स्मार्ट सिटीत डेकोरेशनसाठी विजेवर दुप्पट खर्च : ठिकठिकाणी उभारले दोन खांब
पुणे – स्मार्ट सिटीत डेकोरेशनसाठी विजेवर दुप्पट खर्च करावा लागत असून, आधीच रस्त्यावर विजेचे खांब असताना डेकोरेटिव्ह खांबांवर जवळपास चौपट खर्च महापालिकेने सुरू केला आहे. केवळ खांब उभा करण्याशिवाय विजेवरही दुप्पट खर्च महापालिकेला करावा लागणार आहे.
स्मार्ट सिटीच्या डेकोरेशनच्या नावाखाली शहरात विविध ठिकाणी फुटपाथवर डेकोरेटिव्ह खांब बसवण्यात आले आहेत. फुटपाथ मोठे करण्यात आले असून, त्यावर हे खांब बसवण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, या खांबांच्या शेजारीच रस्त्यांवर साधे खांबही आहेत. त्यामुळे एकाच ठिकाणी दोन खांब बसवण्यात आले आहेत. यामुळे अक्षरश: विजेची दिवाळीच महापालिकेने सुरू केली आहे.
शहरात सुमारे 1,700 किमीच्या रस्त्यांची कामे होणार आहेत. त्यावेळी फुटपाथही मोठे केले जाणार आहेत.
हे फुटपाथ डेकोरेटिव्ह केले असल्याने तेथे विजेचे खांबही नक्षीदार लावण्याचा फंडा शोधण्यात आला आहे. तसेच हे डेकोरेशन करण्याला प्रशासनाचीही हरकत नाही. त्यामुळे सढळ हाताने या डेकोरेशनसाठी नक्षीदार खांब बसवण्याचा धमाका सदस्यांनीही सुरू केला आहे.
डेकोरेटिव्ह असलेल्या एका खांबाची किंमत 30 ते 40 हजार आहे तर साध्या खांबाची किंमत आठ हजार रुपये आहे. हा दर सुमारे पाचपट आहे. त्यामुळे खर्च पाचपट वाढला आहे. शिवाय हे खांब बसवले तरी रस्त्यावरील विजेचे खांब सुरू राहणार आहेतच त्यामुळे एकाच ठिकाणी दोन खांबांची वीज जाळावी लागणार आहे.
स्मार्ट सिटी अंतर्गत हे काम होत आहे. फुटपाथचे सुशोभिकरण करत असताना तेथे आणि ऐतिहासिक ठिकाण असेल, त्याला काही तसा ऐतिहासिक संदर्भ असेल तर डिझायनर खांब लावले तर चालणार आहे, परंतु वाहतुकीच्या रस्त्यांवर असे खांब लावता येणार नाहीत.
-श्रीनिवास कंदूल, विद्युत विभाग प्रमुख, मनपा