एक आठवड्यापासून आयटीआयमधील विद्यार्थ्यांचे नुकसान
पिंपरी – मोरवाडी येथील आयटीआयचा वीज पुरवठा मागील आठवड्यापासून खंडित झाल्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. आयटीआयमध्ये जनरेटर लावून कामकाज करण्यात आले. वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे विद्यार्थ्यांवर मोठा परिणाम होत आहे. महापालिकेच्या विद्युत विभाग आणि महावितरणकडून विद्युत विषयक कामे सुरु असल्याचे कारण देत वीज पुरवठा खंडित करण्यात आला.
पिंपरी-चिंचवड शहर उद्योगनगरी म्हणून ओळखले जाते. उद्योगांना कुशल मनुष्यबळाची मोठी गरज असते. ही गरज मोठ्या प्रमाणात आयटीआय अर्थात औद्योगिक प्रशिक्षण संस्था पूर्ण करते. यामुळे आयटीआयला आवश्यक त्या सुविधा पुरविणे उद्योग आणि भविष्याच्या कुशल मनुष्यबळासाठी खूप गरजेचे आहे. कुशल मनुष्यबळाच्या निर्मितीसाठी महापालिकेकडून मोरवाडी तसेच कासारवाडी येथे औद्योगिक प्रशिक्षण संस्था चालविल्या जात आहेत. या संस्थेमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या 14 कोर्सचे शिक्षण विद्यार्थ्यांना देण्यात येते. त्यामुळे शेकडो विद्यार्थी या संस्थेमध्ये शिक्षण घेत आहेत.
मागील आठवड्यापासून मोरवाडी येथील आयटीआयचा वीजपुरवठा खंडित झाल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले. वीजेअभावी जनरेटरचा वापर करण्यात आला, मात्र अवजड यंत्र सामुग्री जनरेटरवर चालवणे शक्य नसल्याने ती बंद आहे.
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याने लवकरात लवकर वीज पुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी आयटीआयमधील विद्यार्थ्यांकडून केली जात आहे.