परिस्थिती हाताबाहेर! देशात २४ तासांत ९३ हजारांपेक्षा जास्त कोरोनाबाधितांची नोंद

पाचशेहून अधिक रुग्णांचा करोनामुळे मृत्यू

नवी दिल्ली : करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाताना दिसत आहे. फेब्रुवारीपासून करोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घालण्यास सुरुवात केली होती. त्यानंतर हा वेग प्रचंड वाढला असून, देशभरात मागील २४ तासांत ९३ हजारांपेक्षा जास्त करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. नव्या वर्षातील सर्वात मोठ्या रुग्णवाढीचा उच्चांक आहे. त्याचबरोबर २४ तासांच्या कालावधीत पाचशेहून अधिक रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मागील २४ तासांतील करोना रुग्णसंख्येचा आणि लसीकरणाची माहिती प्रसिद्ध केली आहे. देशभरात २४ तासांत ९३ हजार २४९ जणांना करोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं आहे. तर ५१३ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. याच कालावधीत ६० हजार ४८ रुग्ण करोनावर मात करून घरी परतले आहेत. सध्या देशात ६ लाख ९१ हजार ५९७ रुग्ण उपचार घेत असून, आतापर्यंत १ लाख ६४ हजार ६२३ नागरिकांचा मृत्यू झाला आहे.

देशामध्ये इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात रुग्णसंख्येत विक्रमी वाढ झाली आहे. राज्यात शनिवारी ४९ हजार ४४७ करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर २७७ जणांचा मृत्यू झाला. उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्याही चार लाखांवर गेली आहे. मृतांमध्ये सर्वाधिक पुणे शहर ३७, नाशिक शहर १५, औरंगाबाद शहर ३१, नांदेड शहर १३, नागपूर शहर २१, उर्वरित नागपूर जिल्हा १४ जणांचा समावेश आहे. तर उपचार घेत असलेल्या रुग्णांमध्ये पुणे जिल्ह्यात सर्वाधिक ७३,५९९ रुग्ण आहेत. मुंबई ६०,८४६, नाशिक ३१,५१२, औरंगाबाद १४,३०२, नागपूर जिल्हा ५२,४०८ रुग्ण उपचाराधीन आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.