नवी दिल्ली – देशभरात गेल्या 24 तासांत करोनाचे तब्बल सुमारे चाळीस हजार नवीन रूग्ण आढळून आल्याने चिंतेची स्थिती निर्माण झाली आहे. करोना नियंत्रणात आणण्याच्या साऱ्या उपाययोजना असफल होत असून परिस्थिती हाताबाहेर चालली असल्याचे हे लक्षण मानले जात आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार देशात गेल्या 24 तासात करोनाचे एकूण 39 हजार 726 रूग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे देशभरातील करोना रूग्णांची संख्या आता 1 कोटी 15 लाख 14 हजार 331 इतकी झाली आहे. गेल्या 24 तासात करोनाचे एकूण 154 रूग्ण दगावल्याने देशभरात करोनामुळे मरण पावलेल्यांची संख्या आता 1 लाख 59 हजार 370 इतकी झाली आहे. करोनाच्या सर्वाधिक केसेस महाराष्ट्र, पंजाब, कर्नाटक, गुजरात, केरळ या पाच राज्यांत आढळून येत आहे.
गेले आठवडाभर रोज किमान 20 हजारांपेक्षा अधिक रूग्ण आढळून येत आहेत. गेल्या लागोपाठ दोन दिवसांत तर तीस हजारांपेक्षा अधिक रूग्ण आढळून आले आहेत. गेल्या 24 तासांत महाराष्ट्रात सर्वाधिक म्हणजे 25 हजार 833 नवीन रूग्ण आढळून आले. अशा वातावरणातच देशातील पाच राज्यांमध्ये निवडणुकांची प्रक्रिया सुरू असुन विविध राज्यांमधील निवडणूक प्रचार सभांना विविध राजकीय पक्ष मोठी गर्दी जमवत आहेत.
काही राज्यांमध्ये लसीकरणाच्या प्रक्रियेने वेग घेतला असला तरी लसीचा पुरवठा सध्या कमी पडत चालला असल्याची एक नवीच समस्या सर्वत्र निर्माण झाली आहे. दरम्यान दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांनी 18 वर्षावरील सर्वांनाच मोफत लस देण्यास केंद्र सरकारने अनुमती दिली पाहिजे अशी मागणी केली आहे. ही अनुमती केंद्राने दिली तर तीन महिन्यात संपुर्ण दिल्ली राज्याचे लसीकरणाचे काम आम्ही पुर्ण करू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.