नवी दिल्ली – जम्मू काश्मीरातील प्रत्यक्ष ताबा रेषा आणि त्याच्या आसपासच्या प्रदेशातील स्थिती पुर्णपणे नियंत्रणात आहे असे लष्कर उपप्रमुख लेफ्टनंट जनरल एस. के. सैनी यांनी म्हटले आहे. आज ते आपल्या कार्यावर रूजू झाल्यानंतर त्यांचे मानवंदना देऊन स्वागत करण्यात आले. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की भारतीय लष्कर कोणत्याही आव्हानाचा मुकाबला करण्यासाठी सज्ज आहे.
गेल्या वर्षी शस्त्रसंधींच्या उल्लंघनाचे अनेक प्रकार घडले होते. पण अशा प्रत्येक आव्हानांचा आम्ही यशस्वी मुकाबला केला आहे. लष्कराच्या उपप्रमुखपदी त्यांची नुकतीच नियुक्ती झाली आहे; आपल्यापुढील अग्रकम्राच्या कामाचा उल्लेख करताना ते म्हणाले की आधुनिक शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा याची लष्कराला असलेली चणचण दूर करण्याला आमचे प्राधान्य आहे.
उत्तरेकडील सीमा भागातील भारतीय लष्कराची क्षमता व सामर्थ्य वाढवण्यावर लक्ष केंद्रीत केले जात आहे. नव्याने स्थापन झालेल्या सरसेनाध्यक्षांच्या कार्यालयाशी लष्करी मुख्यालयाचा संपर्क वाढवून लष्कराचा एकसंधपणा वाढवण्यावर आपला भर असेल असेही त्यांनी यावेळी नमूद केले.