जम्मू काश्‍मीरमधील परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर

  • सार्वजनिक वाहतुकीवरील निर्बंध शिथील 
  • मोबाईल सेवाही टप्प्याटप्प्याने पूर्ववत 
  • लॅन्ड लाईन फोन काही ठिकाणी कार्यरत

श्रीनगर – जम्मू काश्‍मीरमध्ये सार्वजनिक हालचालींवरील निर्बंध हळूहळू शिथील करण्यात येत आहेत. काश्‍मीर खोऱ्यातील काही भागांमधील लॅन्ड लाईन फोनची सेवा आजपासून पुन्हा सुरू करण्यात आली. मात्र मोक्‍याच्या ठिकाणी असलेला बंदोबस्त अजूनही कायम आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. काश्‍मीरमध्ये 35 पोलिस स्थानकांच्या क्षेत्रांमधील निर्बंध शिथील करण्यात आले आहेत. तर 96 पैकी 17 टेलिफोन एक्‍सचेंजचे काम सुरळीत सुरू करण्यात आले आहे. आता 50 हजार ग्राहकांचे लॅन्डलाईन फोन पूर्ववत सुरू झाले आहेत. अन्य भागातील लॅन्ड लाईन फोन टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात येतील, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.

श्रीनगरमधील सिव्हील लाईन्स, कॅन्टोन्मेंट, एअरपोर्ट, राज बाग आणि जवाहर नगर या भागातील लॅन्ड लाईन फोन सेवा अजूनही बंद आहे. याशिवाय लाल चौक आणि प्रेस्‌ एक्‍न्लेव्ह परिसरातील लॅन्ड लाईन सेवा आणखीन काही काळ बंद राहणार आहे. आण्खी 20 टेलिफोन एक्‍सचेंजमधील कामकाज लवकरच पुन्हा सुरू होणार आहे.

खासगी वाहनांची वर्दळ आता पूर्ववत सुरू झाली आहे. जिल्हापातळीवरील टॅक्‍सीसेवेलाही प्रारंभ झाला आहे. सुरक्षा रक्षकांनी रस्त्यांवर ठिकठिकाणी अडथळे उभारले आहेत. नागरिकांना तपासणीनंतरच जाऊ दिले जात आहे. काश्‍मीर खोऱ्यातील प्राथमिक शाळा सोमवारनंतर सुरू होतील आणि सरकारी कार्यालयातील कामकाजही त्यानंतर सुरू होईल,असे सरकारी प्रवक्‍त्याने सांगितले. सार्वजनिक वाहतुकीबाबत अद्याप कोणतीही अप्रिय घटना घडल्याचे वृत्त नाही. सार्वजनिक वाहतुक सुरू होण्याचे लोकांकडूनही स्वागत होत असल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले.

जम्मू भागातील मोबाईल सेवा सुरू करण्यात आली आहे. मात्र मोबाईल इंटरनेट सेवेवर अद्याप काही निर्बंध आहेत. किमान 5 जिल्ह्यांमध्ये हे निर्बंध हटवण्यात आले आहेत. “2 जी’इंटरनेट सेवा सुरू करण्यात आली आहे, असे जम्मू काश्‍मीर पोलिस प्रमुख दिलबाग सिंग यांनी सांगितले. ताब्यात घेतलेल्या राजकीय नेत्यांना मुक्‍त करण्याबाबतचा निर्णय कायदा आणि सुव्यवस्थेच्या स्थितीवर अवलंबून असून वरिष्ठ पातळीवर घेतला जाणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.