गुजरातमधील स्थिती नियंत्रणाबाहेर जातेय; लॉकडाऊनचा विचार करण्याची सूचना

अहमदाबाद  -देशातील अनेक राज्यांप्रमाणेच गुजरातमधील करोना संकट तीव्र बनत चालल्याचे चित्र आहे. त्याची स्वत:हून दखल घेत गुजरात उच्च न्यायालयाने मंगळवारी राज्यातील स्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याचे निरीक्षण नोंदवले. तसेच, अल्पावधीच्या लॉकडाऊनचा विचार करण्याची सूचना केली.

गुजरातमधील करोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. सोमवारी 3 हजारहून अधिक नवे करोनाबाधित आढळले. ती त्या राज्यातील आजवरची सर्वोच्च दैनंदिन वाढ ठरली. त्यापार्श्‍वभूमीवर, उच्च न्यायालयाने गुजरातमधील करोनाविषयक स्थितीबाबत सुनावणी घेण्यासाठी स्वत:हून पुढाकार घेतला.

राज्यातील स्थिती वाईटातून अतिवाईट बनत आहे. तातडीने आणि गंभीर उपाययोजना करण्याची गरज आहे. अन्यथा, स्थिती हाताबाहेर जाईल. राज्यातील चार प्रमुख शहरांत रात्रीची संचारबंदी लागू आहे. मात्र, ती उपाययोजना प्रभावी ठरत नसल्याचे दिसते. त्यामुळे सद्यस्थितीत तीन ते चार दिवसांची संचारबंदी किंवा तितक्‍याच कालावधीचा लॉकडाऊन याविषयी विचार करता येऊ शकेल, असे न्यायालयाने म्हटले. कमी लोक एकमेकांच्या संपर्कात येतील यादृष्टीने नियम बनवता येऊ शकतील.

राजकीय आणि सार्वजनिक कार्यक्रमांवर नियंत्रण आणण्याचा किंवा त्यांचे आयोजन रोखण्याचा विचार करा, असे न्यायालयाने म्हटले. त्यावर ऍडव्होकेट जनरल कमल त्रिवेदी यांनी राज्य सरकारची भूमिका पुढील सुनावणीवेळी मांडण्याची तयारी दर्शवली. दोन दिवसांपूर्वी सरकार लॉकडाऊन लागू करण्याविषयी गांभीर्याने विचार करत होते. मात्र, लॉकडाऊनमुळे गरीब जनतेचे हाल होतील, असे मत पुढे आले. सरकार कात्रीत सापडले आहे, असे त्रिवेदी यांनी प्रांजळपणे कबूल केले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.