सीताफळ बागांनाही बसला अतिवृष्टीचा फटका

खळद : सीताफळाचे आगार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुरंदर तालुक्‍यात सप्टेंबर-ऑक्‍टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीचा फटका सीताफळ बागांनाही मोठ्या प्रमाणात बसला आहे. शेतकऱ्यांना अनेक वर्ष जोपासलेली झाडे नाईलाजास्तव तोडावी लागत आहेत.

पोमणनगर (ता. पुरंदर) येथील शेतकरी संदीप पोमण यांच्या शेतातील सिताफळ झाडांना अतिवृष्टीचा मोठ्या प्रमाणावर फटका बसला आहे. येथे जमिनीतूनच पाणी येत असल्याने अनेक दिवस शेतात पाणी होते. यामुळे झाडांची मुळे कुजली व पर्यायाने ऐन बहरात असणारी झाडे ही वाळू लागली. त्यामुळे नाईलाजास्तव त्यांना गेली तीस वर्षापासून जोपासलेली लाखो रुपये उत्पन्न देणारी हि झाडे तोडावी लागली, तर सीताफळाबरोबरच पपईच्या झाडांनाही अतिवृष्टीचा मोठा फटका बसला आहे. ही झाडे ही जागेवरच कुजून गेली आहेत. यामुळे त्यांची मोठी हानी झाली आहे.

पोमणनगर-पिंपळे परिसरात अतिवृष्टीमुळे फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. शासनाने याचे पंचनामे केले परंतु खळद, शिवरी, पोमणनगर-पिंपळे परिसरात मात्र फळबागांच्या पंचनामा बाबतीत दुजाभाव झाल्याचे मत येथील शेतकरीवर्गातून व्यक्त करण्यात येत आहे. शासनाने सरसकट सर्व फळ पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत द्यावी, अशी मागणी या भागातील शेतकरी करीत आहेत.

काही दिवसांपूर्वी राज्यपालांच्या वतीने शेतकऱ्यांसाठी जी मदत जाहीर करण्यात आली होती, ती मदत अतिशय तुटपुंजी होती. यातून पुन्हा फळबागांची लागवड करायची म्हटलं तर रोपांचाही खर्च भागायचा नाही यामुळे शेतकरी अस्वस्थ झाला आहे.

  • सध्या नवीन सरकार अस्तित्वात आले असून हे सरकार शेतकरी हिताचे असल्याचे सातत्याने बोलले जात आहे. त्यांनी तरी आता शेतकऱ्यांच्या वेदना जाणून घेऊन शेतकऱ्यांना बळ देण्यासाठी, पुन्हा उभारी घेण्यासाठी भरीव मदत द्यावी.
    – संदीप पोमण, माजी उपसरपंच.
Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)