कोपरगाव : लाडकी बहीण योजनेमुळे केवळ बहीण लाडकी आणि भाऊ दोडका नसून भावासाठीही अनेक योजना आणल्या आहेत. विरोधक चुकीचं बोलत आहेत, असा टोला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधकांना लगावला.
नाशिक येथून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जनसन्मान याञेला सुरुवात करण्यात आली. ही जनसन्मान यात्रा कोपरगाव येथे शनिवारी सायंकाळी ५ वाजता आली. उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष प्रफुल्ल पटेल, खासदार सुनिल तटकरे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर उपस्थित होते.
यावेळी आमदार आशुतोष काळे यांच्या नेतृत्वाखाली जंगी रॅली काढण्यात आली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे शहरातील चौकाचौकात जंगी स्वागत करण्यात आले. अनेक लाडक्या बहिणींनी उपमुख्यमंत्री अजित पवार व आमदार आशुतोष काळे यांना राख्या बांधून औक्षण केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानावर रॅलीचे रुपांतर महासभेत झाले. यावेळी माजी आमदार अशोकराव काळे, चैताली काळे यांच्यासह तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री पवार म्हणाले की, येत्या रक्षाबंधनच्या दिवशी राज्यातील अडीज कोटी महिला लाभार्थींना लाडकी बहीण योजनेतून दोन महिन्याचे तीन हजार रुपये मिळणार आहे. त्यासाठी अगोदरच ६ हजार कोटी रुपयांची तरतूद करून आलो. केवळ निवडणु डोळ्यासमोर ठेवून लाडकी बहीण योजना काढली नसून कायमस्वरूपी ही योजना राबवून गरीब महीलांना सक्षम करण्याबरोबर स्थानिक बाजारपेठेला ऊर्जा देण्याचे काम करतोय.या योजनेमुळे राज्याचे कसलेही आर्थिक नुकसान होणार नाही.
उलट येणाऱ्या विविध करामंधून पैसे दिले जात आहे. इतर राज्यांच्या तुलनेत सर्वाधिक कर आपल्या राज्यात गोळा होतो. आगामी काळात शेतकरी बांधवांसाठी शेतीसाठी मोफत वीज पुरवठा केला जाणार असल्याने यापुढे शेतकऱ्यांना विजबिल येणार नाही. मुलींसाठी मोफत शिक्षण योजना, सुशिक्षित तरुणांसाठी रोजगार निर्मिती बरोबर अनेक सवलती चाल केल्याचे पवार यांनी सांगितले. आगामी काळात आमच्या विचारांचे उमेदवार निवडून दिले तर विकासाच्या अनेक योजना राबवणार असल्याचे सांगत उपस्थित हजारो लाडक्या बहिणींशी पवार यांनी संवाद साधला .
आमदार आशुतोष काळे म्हणाले की, मतदार संघातील शेती पाण्याचा प्रश्न सोडवायचा असेल तर पश्चिमेचे पाणी पूर्वेला वळवावे लागणार आहे. मी पाच वर्षं विकास डोळ्यासमोर ठेवून प्रयत्न करीत होतो. त्याला पवार यांनी मोलाची मदत केली. कोपरगाव मतदारसंघासाठी विक्रमी ३० हजार कोटी निधी हा केवळ अजित पवार यांच्यामुळे मिळाला आहे. यापुढेही पवार मतदारसंघातील प्रश्न सोडवण्या बरोबर मलाही योग्य न्याय देतील, असे म्हणत काळे यांनी पवार यांच्या प्रती ऋण व्यक्त करीत विकासकामांना अधिक सहकार्य करण्याची आशा व्यक्त केली.
आ. काळेंना विक्रमी मताधिक्याने निवडून द्या
आ. आशुतोष काळे हे मला मुलासमान असल्याने त्यांचे बालहट्ट मी कायम पुरवतो.आत्तापर्यत आशुतोष काळे यांनी ज्या कामासाठी निधी मागितले तो निधी त्वरीत दिला आहे. आता कोपरगावच्या जनतेने पुन्हा आशुतोष काळे यांना निवडून द्यावे. मागच्यावेळी कसंबसं घासून निवडून दिले. आता ठासून निवडून देण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.