- नाकाबंदीत चोरट्याला जेरबंद करण्यात हिंजवडी पोलिसांना यश
पिंपरी – एचडीएफसी बॅंकचे एटीएम फोडण्याचा चोरटा प्रयत्न चोरट्याने केला. यामुळे धोक्याची सूचना देणारा सायरन वाजला अन् चोरट्याने धूम ठोकली. बॅंकेच्या मुंबई शाखेतूनही हिंजवडी पोलिसांना याबाबत सूचित करण्यात आले. त्यानंतर पोलिसांनीही त्वरीत हालचाली करीत अवघ्या दीड तासात चोरट्याला जेरबंद केले. ही घटना भूमकर चौक, वाकड येथे रविवारी (दि. 30) पहाटे घडली.
नंदू करण थापा (वय 35, सध्या विनायकनगर, पुणे, मूळगाव नेपाळ) असे जेरबंद करण्यात आलेल्या चोरट्याचे नाव आहे. संदीप हिरासिंग जाधव (वय 35, रा. पिंपळे सौदागार) यांनी रविवारी (दि. 30) याबाबत हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलीस निरीक्षक (गुन्हे) अजय जोगदंड यांनी दिलेल्या माहितीनुसार भूमकर चौक, वाकड येथील आरियाना बिल्डींगमध्ये एचडीएफसी बॅंकेचे एटीएम आहे. पहाटे 1.55 मिनिटांनी एका चोरट्याने बॅंकेचे एमटीएम फोडण्याचा प्रयत्न केला. मात्र धोक्याची सूचना देणारा सायरन वाजू लागल्याने चोरट्याने पळ काढला.
एमटीएमवर लक्ष ठेवणाऱ्या मुंबईतील सुरक्षा यंत्रणेने याबाबत हिंजवडी पोलिसांना कळविले. यामुळे नाकाबंदीवर असलेले उपनिरीक्षक रवींद्र मुदळ आणि रात्रगस्तीवर असलेले उपनिरीक्षक अजित काकड घटनास्थळी हजर झाले. त्यानंतर पोलीस निरीक्षक अजय जोगदंडही घटनास्थळी हजर झाले. पोलिसांनी घटना स्थळाची पाहणी केली. त्यानंतर मुंबईतील बॅंकेच्या सुरक्षा यंत्रणांनी संशयित चोरट्याचे सीसीटिव्हीत कैद झालेले छायाचित्र हिंजवडी पोलिसांना पाठविले.
हिंजवडी पोलिसांनी आणखी नाकाबंदी करीत परिसरातील गस्तही वाढविली. दीड तासानंतर संशयित चोरटा हिंजवडीच्या लक्ष्मी चौकात वावरताना आढळून आला. पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले असून, अधिक चौकशी सुरू आहे. बॅंकेची सुरक्षा यंत्रणेने दाखविलेली तत्परता आणि पोलिसांनी त्वरीत केलेल्या उपाययोजनेमुळे चोरटा जेरबंद झाल्याने नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.