संस्काराची शिदोरी

आनंद यादव यांच्या “स्पर्शकमळे’ या ललित लेखसंग्रहातील एका लेखात, “आयुष्यात अनेकजणी आल्या. प्रत्येक वेळी जीव थोडा घुटमळला. कुणाचा चेहरा आवडला. कुणाच्या ओठांनी मोहिनी घातली, पण सौंदर्याच्या या भुलभलैय्यात जीव फार वेळ रमायचा नाही. त्याला आणखी काही तरी वेगळं हवं असायचं.’ असा काहीसा परिच्छेद आहे. हे वेगळं म्हणजे काय याचा शोध घेण्याचा प्रयत्न खूप कमी माणसं करतात. “तिचं सौंदर्य आणि त्याचं कर्तृत्व’ हे आकर्षणाचं प्रथमदर्शनी केंद्र आहे अशीच खात्री असते प्रत्येकाला, पण आकर्षण म्हणजे प्रेम नव्हे. केवळ सौंदर्याधिष्टित प्रेमाचा जीव केवढा, अक्षरशः किडामुंगी एवढा. छोट्याशा गैरसमजाने, एकमेकांमधल्या अहंकाराने असं प्रेम गतप्राण होतं; परंतु तो तिच्या गुणांवर प्रेम करत असतो तेव्हा गैरसमजाची, संकटाची कितीही वादळे आली तरी त्या प्रेमात कधीच दरी पडत नाही. गुणांवरच्या प्रेमाला कधीही ओहोटी लागत नाही. म्हणूनच माझ्या एका कवितेत मी म्हटले आहे-
आली किती तुफाने गेली किती तुफाने
जपली तरी मी स्वप्ने मखरात चांदण्यांची
येणाऱ्या जाणाऱ्या वादळात मनाच्या मखरात चांदण्यांची स्वप्नं जपणारा एखादाच असतो. कारण त्याला सौंदर्याची पक्वानं नसली तरी चालतात. त्याला भूक असते ती संस्काराच्या शिदोरीची. संस्कार हे सूर्यप्रकाशासारखे असतात. अंधार पडतो तो सूर्य मावळतो म्हणून. अंधार पडला म्हणून सूर्य मावळत नाही कधी, पण सूर्य उगवल्यावर अंधाराला काढता पाय घ्यावाच लागतो. कारण सूर्यावर प्रकाशाचा संस्कार असतो तर अंधारावर काळोखाचा. काळोखाच्या संस्काराचा दिव्याच्या प्रकाशासमोर टाकाव लागत नाही मग, सूर्याच्या प्रकाशासमोर अंधाराची “पळता भुई थोडी’ होणारच ना. त्यामुळेच तिचे संस्कार जेव्हा सूर्य प्रकाशासारखे असतात तेव्हा गैरसमजाचा अंधार फार वेळ टिकत नाही. चंद्रावर शीतलतेचा संस्कार असतो. चंद्राच्या चंद्रकलाही माणसाच्या डोळ्यांना सुखावतात. चांदण्या लुकलुकतात. अंधाराला क्षीण करणाऱ्या शीतल प्रकाशाची उधळण करतात. एवढ्या विशाल आकाशात शुक्राच्या चांदणीचा शोध घेणे फार कठीण जात नाही. कारण सर्व चांदण्यात तिचं तेज हे वेगळंच असतं. म्हणून संस्कारात सूर्यकिरणांचे तेज असावेच; पण चांदण्यांची शीतलताही असावी. कारण सूर्याचा प्रकाश जसा माणसाला हवाहवासा असतो तशीच चांदण्यांची शीतलताही.

प्रेमाचं प्रतीक असणाऱ्या ताजमहालावर सौंदर्याचा संस्कार असतो. तर शेंदूर लावलेल्या दगडावर शेंदराचा. ताजमहाल भव्य असतो. संगमरवरी असतो. देखणा असतो. त्याची कलाकुसर माणसाच्या मनाला मोहात पाडते. पण देवळातल्या शेंदूर फासलेल्या दगडासमोर नतमस्तक होणारा भाविक ताजमहाल समोर कधीच नतमस्तक होत नाही. त्यामुळेच भव्यतेच्या, सौंदर्याच्या संस्कारापेक्षा शेंदराचे संस्कार अधिक मोलाचे वाटतात. सौंदर्याच्या मोहापेक्षा माणसातल्या देवत्वाची अधिक गरज असते प्रत्येकाला. पण ज्याला देवत्वाचं महत्त्व कळतो तोच त्यात रमतो आणि बाकीचे सौंदर्यात बुडून जाण्यासाठी सामान्य जंतू होऊन वळवळत राहतात.

माणूस ओढ्याच्या धारेला ओंजळी घेऊन तहान भागवू शकतो, पण विशाल समुद्राच्या किनाऱ्यावर उभा असलेल्या माणसाला समुद्राचं पाणी ओंजळीत घेऊन प्राशन करता येत नाही. कारण ओढ्याच्या पाण्यात गोडवा असतो तर समुद्राच्या पाण्यात खारटपणा, पण तरीही माणूस समुद्र किनाऱ्यावर रमतोच. का? कारण समुद्राची विशालता माणसाला आवडते, पण आवड आणि प्रेम यात फरक असतोच. त्यामुळेच समुद्र किनाऱ्यावर राहणाऱ्या माणसालाही पिण्याच्या पाण्यासाठी विहीरच खोदावी लागते. पण समुद्र किनाऱ्यावर असणारी विहीर समुद्राचा खारटपणा स्वतःमध्ये येऊ देत नाही. कारण खारटपणाचे संस्कार कुणालाच नको असतात.

रानावनातून भ्रमंती करताना हिरवाईचा संस्कार असलेलं रान माणसाला सोबतीला हवं असतं. प्रवासात डेरेदार वृक्षांची, घनदाट झाडांची सोबत हवी असते. पायवाटेने चालताना वाटेच्या कडेने रानफुलं असलेली पायवाट माणसाला अधिक सुखावते. वाटेत ओढ्यांचा खळखळाट ऐकू आला तर माणसाची पावले काही न ठरवता त्या ओढ्याच्या वाटेला वळतात. ओढ्याच्या गारव्यात रमतात. ओढ्याच्या गार पाण्याचा सपकारा चेहऱ्यावर मारला की मलूल झालेला चेहरा पुन्हा फुलून येतो. ताजातवाना होता. ज्या माळरानावर वाळून गेलेल्या गवतकाडीचे, सुकून गेलेल्या झाडाझुडपांचे, आटून गेलेल्या ओढ्यांचे, सावली हरवलेल्या झाडांचे संस्कार असतात त्या रानात कोणाचाच जीव रमत नाही. म्हणून माणसावर वाळलेल्या रानाचे नव्हे तर हिरवाईचे संस्कार असावेत.

दुसऱ्याला पोळून काढणाऱ्या वैशाख वणव्याचे संस्कार कधीच असू नयेत आपल्यावर. उगाच का कुणाच्या जीवाचा चटका व्हावं आपण? होता आलंच आपल्याला तर एखाद्याच्या जखमेवरची फुंकर व्हावं. पण जेष्ठातल्या मृगाचे, श्रावणाच्या सरीचे संस्कार नक्कीच असावेत आपल्यावर. दुसऱ्याच्या जीवाला गारवा देणारा श्रावण, वाळलेल्या माळरानाला हिरवळ देणारा श्रावण, ओढ्या नाल्यातून खळाळून वाहणारा श्रावण. पानगळीचा शिशिर नको व्हायला आपण. वसंताचं रूप होऊन सृजनाचा संस्कार व्हावं. पाण्यावरदेखील संस्कार असतात प्रवाहीपणाचे. मिळेल त्या मार्गाने पुढे जाण्याचे. वेळप्रसंगी मिळेल त्या आकारात साचून राहण्याचे. साचून राहिल्यानं पाण्याचं डबकं होतं. त्यामुळे साचून राहाणे हा स्वभाव नाही पाण्याचा. प्रवाहीपणा हाच पाण्याचा संस्कार. संस्कारसुद्धा साचून राहून नाही चालत. ते एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे प्रवाही व्हायला हवेत.

ज्या व्यक्तीवर आईच्या ममतेचे, ताजमहालाच्या सौंदर्याचे, शेंदरामधल्या पावित्र्याचे, ओढ्यातल्या गोडव्याचे, समुद्राच्या विशालतेचे, सूर्याच्या प्रकाशाचे, चांदण्यांच्या शीतलतेचे, रानातल्या हिरवाईचे, पाण्याच्या प्रवाहाचे, नव्याने अंकुरणाऱ्या वसंताचे संस्कार असतात त्या व्यक्तीवर प्रेम करायला कुणाला आवडणार नाही. तिच्यात असे सगळे संस्कार असतात तेव्हा त्याचा जीव अडकतो तिच्यात. सौंदर्य हा सोन्याचा पिंजरा असतो तर संस्कार हे मोकळं आभाळ. संस्काराच्या आभाळात मुक्त विहार करायचा की सौंदर्याच्या पिंजऱ्यात स्वतःला बंदीस्त करून घ्यायचं हे ज्याचं त्यानं ठरवावं.
प्रत्येकाला आपल्या आयुष्यात सौंदर्याच्या पंचपक्वानांपेक्षा संस्काराच्या शिदोरीची अधिक गरज असते. कारण संस्काराची शिदोरी आयुष्यभर पुरू शकते, पुरते. ती तिच्या संस्काराची शिदोरी त्याच्या गाठीला बांधून देईल यासाठी वर्षानुवर्षे वाट पाहाणारा एखादाच असतो. अशावेळी तिने त्याला समजून घ्यायला हवं. उन्हात चालणाऱ्या माणसाच्या वाटेवरची सावली व्हायला हवं. एखाद्याच्या अंधारलेल्या वाटेवरचा प्रकाश व्हायला हवं. वेळ काळ पाहून कधी अंधार मिटवणारा पहाटेचा सूर्य व्हायला हवं तर कधी शीतल प्रकाश देणाऱ्या नभातल्या चांदण्या व्हायला हवं.

विजय शेंडगे

Leave A Reply

Your email address will not be published.