पिंपरी (प्रतिनिधी) – एका दहा वर्षाच्या मुलीवर 55 वर्षीय व्यक्तीने अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. मात्र मुलीने आरडाओरडा केल्याने तिच्या आईने तिची सुटका केली. ही घटना रविवारी (दि. 15) भोसरी येथे घडली.
लियाकत अली खान (वय 55, रा. धावडे वस्ती, भोसरी) असे पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत 32 वर्षीय मुलीच्या आईने रविवारी (दि. 15) भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर अवताडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी अकरा वाजताच्या सुमारास आरोपी लियाकत हा फिर्यादी यांच्या अल्पवयीन मुलीस घेऊन एका बिल्डींगच्या टेरेसवर गेला. तिथे त्याने मुलीशी अश्लिल चाळे करीत तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. तिचा आरडाओरडा ऐकून आईने तसेच इतर नागरिकांनी टेरेसकडे धाव घेत मुलीची सुटका केली. भोसरी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. पोलीस उपनिरीक्षक तलवाडे याबाबत अधिक तपास करीत आहेत.