आयटी कंपन्यांवर लॉकडाऊनचा जास्त परिणाम
मुंबई – अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी डिसेंबरपर्यंत एच 1- बी व्हिसा स्थगित केला आहे. मात्र याचा भारतीय माहिती तंत्रज्ञान उद्योगावर अल्प परिणाम होणार असल्याचे सांगण्यात आले.
नेमका किती परिणाम होईल या संदर्भातील आढावा ईक्रा या संस्थेने घेतला. त्यानुसार माहिती तंत्रज्ञान कंपन्यावर केवळ 1200 कोटी रुपयांचा परिणाम होणार आहे. कंपन्यांच्या नफ्यावर 0.25 ते 0.30 टक्के परिणाम होईल, असे या संस्थेच्या अभ्यास अहवालात म्हटले आहे.
अमेरिकेतील एच1- बी व्हिसाबाबत अनेक वर्षांपासून नकारात्मक वातावरण निर्मिती झाल्यामुळे अमेरिकेत कार्यरत भारतातील कंपन्यांनी स्थानिक कर्मचारी भरती वाढविलेली आहे. त्यामुळे अतिशय कमी प्रमाणात भारतातील कर्मचाऱ्यांना अमेरिकेत नेऊन त्यांच्याकडून काम करून घ्यावे लागते. भारतातील जे कर्मचारी अमेरिकेत जाऊन काम करतात त्या कर्मचाऱ्यांचे काम उच्च तंत्रज्ञानावर आधारित असते. त्यामुळे अशा कामासाठी अमेरिकेत कुशल मनुष्यबळ उपलब्ध होत नाही. त्यामुळे अमेरिकेतील काही बड्या माहिती-तंत्रज्ञान कंपन्यांचे नुकसान होऊ शकते.
अमेरिकेने निर्बंध आणल्यामुळे माहिती तंत्रज्ञान कंपन्यांवर कमी परिणाम होणार असला तरी भारतात चालू असलेल्या लॉकडाऊनचा मात्र त्यापेक्षा जास्त परिणाम होणार आहे. व्हिसावरील वरील निर्बंधाचा भारतातील कंपनीच्या नफ्यावर केवळ 0.30 टक्क्यापर्यंत परिणाम होणार असला तरी करोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे भारतातील कंपन्यांच्या नफ्यावर अडीच टक्के परिणाम होऊ शकतो.