भोरमधील दुकाने रोज सहाच तास उघडणार

व्यापारी संघटनांचा एकमुखी निर्णय

भोर  (प्रतिनिधी) – शासनाने रोज सकाळी 7 सायंकाळी 7 वाजेपर्यंत दुकाने खुली ठेवण्यास परवानगी दिली आहे. मात्र भोर शहरातील किराणा भुसार व्यापारी असोसिएशन, सराफ असोसिएशन, युवा व्यापारी संघटना व कापड व्यापारी असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांचे आज (सोमवारी) झालेल्या बैठकीत दुकाने सकाळी 9 ते दुपारी 3 वाजेपर्यंतच खुली ठेवण्याचा एकमुखी निर्णय घेण्यात आला आहे.

सध्या सुरू असलेल्या लॉकडाऊन आणि संचारबंदीमुळे तालुक्यातील सर्वप्रकारचे उत्सव बंद झाले असले तरी करोना व्हायरसबाबत नागरिकांत जागृती झाली असल्याचे चित्र आहे. मात्र पुण्या-मुंबईवरून रेड झोनमधील आणि भोर शहरातील विविध बॅंका, काही शासकिय कार्यालयातील कर्मचारी रोजच्या रोज भोरमध्ये न राहता पुण्यावरून ये- जा करत असल्याचे निदर्शनात येत आहे.

या शिवाय काहीही काम नसताना तालुक्यातील काही बाहेरुन आलेले लोक भोरच्या बाजारपेठेत विनाकारण भटकताना दिसतात. ही संख्याही मोठी असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे करोनाचा धोका संपलेला नसल्याने भोर शहरातील व्यापारी संघटनांनी हा निर्णय घेतला असल्याचे महेश धरु, महेंद्र ओसवाल, अमर ओसवाल व बंडूशेठ गुजराथी यांनी सांगितले.

भोर शहरातील व्यापाऱ्यांनी घेतलेला हा निर्णय स्वागतार्ह आहे. यामुळे शहर आणि तालुक्यातील करोनाचा संसर्ग रोखण्यास मदत होणार असून नागरिकांनी अत्यावश्यक काम असेल तरच शहरात यावे, अन्यथा घरीच थांबावे.

– राजेंद्रकुमार जाधव, उपविभागीय अधिकारी भोर.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.