जुन्नर – उधारीवर चिकन दिले नाही म्हणून 42 वर्षीय इसमाने दुकान मालकास शिवीगाळ दमदाटी केल्या प्रकरणाची तक्रार पोलीस ठाण्यामध्ये दिल्याचा राग मनात भरून चिकन दुकान मालकास व त्याच्या घरच्यांना रस्त्यात अडवून शिवीगाळ मारहाण करीत, त्यांची दुचाकी जबरदस्तीने पळवून नेऊन ती विहिरीत टाकल्याप्रकरणी दाखल फिर्यादीनंतर या इसमास अटक करण्यात येऊन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गौतम प्रकाश लवांडे (वय 42, रा. केवाडी, ता. जुन्नर) याला या प्रकरणी अटक करण्यात आली असून, गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात आल्यानंतर त्याची रवानगी येरवडा कारागृह, पुणे येथे करण्यात आली आहे. अब्दुल रहमान शेख (रा. केवाडी) यांनी या घटनेची फिर्याद दाखल केली आहे.
शेख यांचे या गावात चिकन विक्रीचे दुकान असून, ते बंद करून रात्री घरी आले असताना गौतम याने “दुकान उघडून उधारीवर चिकन देण्याची मागणी केली’, यावेळी त्याने शिवीगाळ दमदाटी केल्याने याबाबतची तक्रार देण्याकरीता दुकान मालक, त्याचे आई-वडील जुन्नर पोलीस ठाण्यात तक्रार देण्याकरीता आले होते. तक्रार देऊन ते घरी जात असताना त्यांना रस्त्यात अडवून शिवीगाळ दमदाटी, मारहाण करीत त्याने त्यांची दुचाकी जबरदस्तीने पळून नेली. या दुचाकीचा शोध घेत असताना ती लवांडे यांच्या विहिरीमध्ये त्याने टाकून दिल्याचे स्पष्ट झाले.