पिंपरी – बर्गरचे पैसे मागितल्याच्या कारणावरून बेकरी चालकाला मारहाण करून लुटणाऱ्या चार जणांना चिखली पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना रविवारी (दि. 8) रात्री रूपीनगर येथे घडली. नितीन शिंदे, सचिन ऊर्फ अंड्या, रुपेश आखाडे, आकाश ऊर्फ गुंड्या भालेराव (रा. सर्व रा. रुपीनगर, तळवडे) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तसेच त्यांच्या त्याचा अनोळखी साथीदारवरही (नाव, पत्ता माहिती नाही) गुन्हा दाखल झाला आहे.
श्रेयस दिलीप गरूडे (वय 25, रा. गंगाभारती हौसिंग सोसायटी, रुपीनगर, तळवडे) यांनी सोमवारी (दि. 10) याबाबत चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी गरूडे यांचे डब्ल्यू एस बेकर्स नावाचे रुपीनगर येथे दुकान आहे. या दुकानात आरोपी बर्गर खाण्यासाठी आले.
दोन बर्गर दिल्यानंतर फिर्यादी यांनी पैसे मागितले. या कारणावरून चिडलेल्या आरोपींनी फिर्यादी हे रात्री साडेअकरा वाजताच्या सुमारास दुकान बंद करीत असताना त्यांना लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. तसेच दुकान फोडण्याची धमकी देत त्यांच्या खिशातील अडीच हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतले. सहाय्यक निरीक्षक नकुल न्यामणे अधिक तपास करीत आहेत.