अपेक्षा वाढवल्या नेमबाजांनी

आयएसएसएफ विश्‍वकरंडक स्पर्धेत भारताचे तब्बल पंधरा नेमबाज आगामी टोकियो ऑलिम्पिकला पात्र ठरले. हे भारताच्या ऑलिम्पिक सहभागाच्या इतिहासात पहिल्यांदाच घडले आहे. अर्थात, यंदा भारतीय नेमबाजांनी आपल्या गुणवत्तेची साक्ष या स्पर्धेच्या सुरुवातीपासूनच दिली. पण केवळ यात आनंद मानण्यात वेळ घालवण्यात अर्थ नाही. कारण आता टोकियोत सहभागी होत असलेल्या या खेळाडूंकडून अपेक्षा वाढल्या आहेत.

बलाढ्य अमेरिकेलाही मागे टाकत भारतीय खेळाडूंनी या स्पर्धेत तब्बल 30 पदके पटकावली. त्यात 15 सुवर्ण, 9 रजत तर 6 ब्रॉंझपदकांचा समावेश आहे. या पदकतालिकेत अमेरिका 8, इटली 4, डेन्मार्क 3 व पोलंड 7 अशी स्थिती आहे. म्हणजेच जी राष्ट्रे या खेळात मक्‍तेदारी मिरवत होते त्यांचीच अवस्था विकसनशील देशासारखी बनली आहे. याला खरेतर राजवर्धन राठोड यांना त्याचे श्रेय बहाल केले पाहिजे. 2004 सालच्या अथेन्स ऑलिम्पिकमध्ये त्यांनी डबल ट्रॅपमध्ये भारताला पदक मिळवून दिले व तेव्हापासूनच जवळपास प्रत्येक ऑलिम्पिकमध्ये भारतीयांनी पदके मिळवली आहेत.

केवळ नेमबाजीतच सातत्याने पदके मिळाली असे नाही तर खेळ कोणताही असो भारतीय खेळाडूंनी तेव्हापासून प्रत्येक ऑलिम्पिक गाजवले. आता या नेमबाजांच्या कामगिरीमुळे यंदाच्या टोकियो स्पर्धेतही आपले नेमबाज पदके घेऊन मायदेशी येतील, असा विश्‍वास वाटतो. आजवर विश्‍वकरंडक, आशियाई, राष्ट्रकुल तसेच विविध आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडूंनी आपले वर्चस्व सातत्याने सिद्ध केले आहे. मात्र, इतक्‍या मोठ्या संख्येने आपले नेमबाज पात्र झाल्याचे यंदा प्रथमच घडल्यामुळे यातीलच काही निवडक खेळाडू असे आहेत की ज्यांच्यावर आपण पदकांची अपेक्षा टेवू शकतो.

हरियाणाची मनु भाकर, यशस्विनी सिंग, श्रीनिवेता, पृथ्वीराज टोंडायमन, लक्ष्य शेरॉन, कायनन चेनॉय, श्रेयसी सिंग, राजेश्‍वरी कुमारी, मनीषा कीर, राही सरनोबत, तेजस्विनी सावंत, ऐश्‍वर्य प्रताप सिंग तोमर, दीपक कुमार, पंकज कुमार, गनेमत सेखो, विजयवीर सिधू, गुरप्रीत सिंग आणि आदर्श सिंग या खेळाडूंनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक पदकांची कमाई केली आहे मात्र, आता त्यांच्याकडून ऑलिम्पिकच्याच पदकाची अपेक्षा आहे. नेमबाजीत गगन नारंगने राठोडच्या पावलावर पाऊल ठेवत नेत्रदीपक कामगिरी केली. आता हे खेळाडू त्यांचे निश्‍चितच वारसदार बनतील. या स्पर्धेत महाराष्ट्राच्या आशेबाबत बोलायचे झाले तर तेजस्विनी सावंत, राही सरनोबत यांच्यावरच सर्वात जास्त अपेक्षा आहेत व यंदा टोकियोत ऑलिम्पिक पदकाचा निश्‍चितच वेध घेतील असा विश्‍वासही आहे.

भारतीय खेळाडू आणि ऑलिम्पिकचे पदक काही दशकांपूर्वी व्यस्त गणित वाटत होते मात्र, आता भारतात जागतिक कीर्तीचे खेळाडू पुढे येत आहेत. आधी केवळ क्रिकेटचाच बोलबाला होता. आज अन्य खेळांनाही सुगीचे दिवस आले आहेत. त्यात अशीच दिवसेंदिवस वाढ होत जावी आणि विविध क्रीडा प्रकारातही जगजेत्ते तयार व्हावेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.