जिनिव्हा – जगभरात कोविड-19 च्या रुग्णांची संख्या 13 कोटींहून अधिक झाली आहे. करोनाचा प्रसार जगभर सुरुच आहे. जगभरात कोविड-19 मुळे आजवर 28 लाखाहून अधिक लोक प्राणाला मुकले असल्याचे जॉन हॉपकिन्स विद्यापीठाने म्हटले आहे. विद्यापीठाच्या सिस्टीम्स सायन्स आणि इंजिनियरींग केंद्राने काल दिलेल्या अहवालात अमेरिकेला या साथीचा सर्वाधिक फटका बसल्याचे म्हटले आहे. अमेरिकेत करोना रुग्णांची संख्या 3 कोटींहून अधिक झाली असून 5 लाख 54 हजारांहून अधिक या आजाराने प्राणाला मुकले आहेत.
ब्राझील दुसऱ्या क्रमांकावर असून तिथे 1 कोटी 28 लाखाहून अधिक रुग्ण तर 3 लाख 28 हजारांहून अधिक मृत्यु झाले आहेत. रुग्णसंख्या सर्वाधिक असलेल्या इतर देशांमध्ये भारत, फ्रान्स, रशिया, ब्रिटन, इटली, तुर्की, स्पेन, जर्मनी, कोलंबिया, पोलंड, अर्जेंटिना आणि मेक्सिको यांचा समावेश आहे. कोविड-19 मुळे झालेल्या मृत्युंच्या बाबतीत मेक्सिको तिसऱ्या स्थानावर आहे.