ऑक्सिमीटर, ग्लुकोमीटर घेण्याकडे कल
पिंपरी – शहरामध्ये करोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढत आहे. तसेच मृत्यूंचा आकडाही वाढत आहे. त्यामुळे पुढील काही दिवस करोनासोबतच जगावे लागणार असल्याची मानसिकता नागरिकांची झाली आहे. त्यामुळे नागरिक आता तापमान, ऑक्सिजन लेव्हल आणि पल्स रेट घरीच तपासत आहेत.
मार्च महिन्यामध्ये करोनाचा पहिला रुग्ण आढळला. त्यानंतर शहरामध्ये आजपर्यंत सातत्याने रुग्ण वाढत आहेत. गेल्या सहा महिन्यामध्ये तब्बल 76 हजाराहून अधिक जणांना करोनाची लागण झाली आहे. तर मृत्यूची संख्याही 1700 च्या पुढे गेली आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांमध्ये करोनाची धास्ती वाढली आहे. मधुमेह, रक्तदाब किंवा गंभीर शस्त्रक्रिया असलेल्या व्यक्तींसाठी करोना जास्त धोकादायक ठरत आहे. याबाबत शहरातील नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे.
परिणामी नागरिक तणावाखाली राहू लागले आहेत. मधुमेह, रक्तदाब असलेल्या व्यक्तीच नव्हे, तर अगदी सामान्य व्यक्तीही यापासून वाचण्यासाठी आवश्यक त्या प्राथमिक चाचण्या करण्याबाबत सजग राहू लागला आहे. मात्र या चाचण्या करताना संसर्ग होऊ शकतो या भीतीने नागरिक मनपाचे दवाखाने व लॅबोरेटरीत न जाता घरीच वैद्यकीय चाचण्या करत आहेत.
घरातील इतर सदस्यांच्या सुरक्षिततेसाठी बहुतांश लोक घरातच ऑक्सिजनचा स्तर पाहण्यासाठी ऑक्सिमीटर, रक्तदाब तपासण्यासाठी डिजिटल बीपी मॉनिटर, रक्तातील शर्करा तपासण्यासाठी ग्लुकोमीटर आदी उपकरणे आणून घरीच चाचण्या करू लागले आहेत.
1)ऑक्सिमीटर (किंमत 1000 ते 2500)
ऑक्सिजनचा स्तर उच्च असणे आवश्यक असते. अन्यथा श्वसनाचा त्रास उद्भवतो. करोना आजारात ऑक्सिजन स्तर राखणे आवश्यक आहे. ऑक्सिजन तपासण्यासाठी बहुतांश व्यक्तींनी घरी ऑक्सिमीटर ठेवलेला आहे.
2)डिजिटल बीपी (किंमत 2500 ते 4500)
प्रत्येकाला डॉक्टरांकडे असलेल्या मर्क्युरी इन्स्ट्रुमेंटवर रक्तदाब तपासणे माहीत नसते. अशा नागरिकांसाठी डिजिटल बी पी मॉनिटर आहे. त्यांना यावर रक्तदाब तपासता येतो.
3) ग्लुकोमीटर (किंमत 1200 ते 2500)
रक्तातील साखर तपासण्यासाठी ग्लुकोमीटरवर घरीच चाचणी करता येते. चाचणी घेताना सुईच्या माध्यमातून शरीरातील काही थेंब रक्त काढले जाते. ते ग्लुकोमीटरच्या किटवर ठेवून रक्तातील साखर तपासता येते. मात्र यामध्ये एका व्यक्तीसाठी एकच सुई वापरणे आवश्यक आहे.
करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे नागरिक आता घऱीच वैद्यकीय साहित्यांच्या माध्यमातून तपासणी करत आहेत. ऑक्सिजन, रक्तदाब, रक्तातील साखर याचे प्रमाण तपासण्यासाठी विविध वैद्यकीय साहित्यांची मागणी नागरिक करत असतात. त्यामुळे ऑक्सिमीटर, ग्लुकोमीटर, डिजिटल बीपी मशीन यांची मागणी वाढली आहे.
– रुपेश जैन, औषध विक्रेते.