मुंबई – “छत्रपती शिवरायांचा अपमान सहन करणारे हे सरकार सीमा प्रश्नाला, मराठी बांधवांना न्याय देईल असे वाटत नाही. आता महाराष्ट्रालाच उठाव करावा लागेल. 20 लाख मराठी बांधव कानडी जोखडात गेल्या 50-60 वर्षांपासून अडकून तडफडत आहेत. त्यांची बाजू मांडणाऱ्यांना तुरुंगात टाकू, मुस्कटदाबी करू, अशा धमक्या महाराष्ट्राचे मंत्री शंभुराजे देसाई व भाजप अध्यक्ष बावनकुळे देत असतील तर महाराष्ट्राने गुडघे टेकले असून सीमाभागाचा सौदा या लोकांनी केला आहे, हे सिद्ध होते. त्यामुळे आता महाराष्ट्रालाच उठाव करावा लागेल” अशी टोलेबाजी शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामानातून करण्यात आली आहे.
कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या सीमावादावरून सुरु झालेल्या राजकारणावर सामनातून भाष्य करण्यात आलं आहे.”महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नाने उग्र स्वरूप धारण केले. पण ही उग्रता फक्त कर्नाटकच्या बाजूने दिसत आहे. कारण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिंदे व त्यांचे मिंधे सरकार तोंडास कुलूप लावून बसले आहे. आधी शिवरायांच्या अपमानावर तोंडास कुलूप व आता सीमाप्रश्नी पडखाऊ धोरण, हे बरे नाही”. अशी टोलेबाजी सामनातून करण्यात आली आहे.
“सरकारातील दोन मंत्री चंद्रकांत पाटील व शंभुराजे देसाई हे चार दिवसांपूर्वी बेळगावाला निघाले, पण कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी दम भरताच मागे फिरले. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, ‘वाद वाढवू नये.’ उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, बेळगावात जाऊ नका. मग महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचे, सीमा भागाचे, मराठीजनांचे धिंडवडे निघत असताना मूर्खासारखे बघत राहायचे काय? रात्रीच्या अंधारात लपत छपत, काय तर म्हणे गनिमी काव्याने चाळीस आमदारांचे पार्सल खोके सुरतला पाठवणारे शिंदे सरकार दोन मंत्री बेळगावात पाठवू शकले नाही” असा टोला देखील सामनातून लगावण्यात आला आहे.
“प्रांतीय, जातीय तणाव निर्माण करून भाजपला तेथील निवडणुका जिंकायच्या आहेत व त्यासाठी महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा बळी दिला जात आहे. पण या लोकांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी, कामाख्या देवीस जाऊन नवसाचा रेडा बळी देणे सोपे आहे, पण महाराष्ट्र म्हणजे रेडा नसून वाघ आहे व तो महाराष्ट्रावर चाल करून येणाऱ्यांचाच बळी घेतल्याशिवाय राहणार नाही. कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई हे महाराष्ट्राकडे पाहून पिसाळलेल्या कुत्र्याप्रमाणे भुंकत आहेत. लचके तोडण्यासाठीच हल्ले करीत आहेत. पण स्वतःस ‘भाई’, ‘भाऊ’ म्हणवून घेणारे मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री पिसाळलेल्या कुत्र्यापुढे नांगी टाकत असतील तर छत्रपती शिवरायांचे नाव सांगणाऱ्या महाराष्ट्र सरकारला हे आव्हान आहे. देशाचे गृहमंत्री कश्मीरचा प्रश्न सोडविल्याची भाषा करतात. पंतप्रधान मोदी यांच्या महान मध्यस्थीमुळेच युक्रेन – रशियातील युद्ध थंड पडले. मग या दोघांना कर्नाटकच्या बेताल मुख्यमंत्र्याचा महाराष्ट्रावरील हिंसाचार का रोखता येत नाही?” असा सवाल सामनातून उपस्थित करण्यात आला आहे.