पिंपरी, (प्रतिनिधी) – पिंपरी चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणार्या पवना व भामा आसखेड धरणातील वाटकेरी वाढले आहेत. पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाला (पीएमआरडीए) ला वाणिज्यिक वापराकरिता पवना धरणातून 0.0591 दशलक्ष घन मीटर पाण्याचा कोटा मंजूर करण्यात आला आहे.
तर भामा आसखेड धरणातून चाकण नगरपरिषदेला पिण्यासाठी 5.562 वाढीव दशलक्ष घन मीटर पाणी कोटा मंजूर करण्यात आला आहे. जलसंपदा विभागाने पाणीकोटा वितरणास मान्यता दिली आहे.
पिंपरी चिंचवड शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेत, पुढील 50 वर्षाच्या नियोजनासाठी पिंपरी चिंचवड महापालिका आता मुळशी धरणातून अतिरिक्त पाणीसाठा मिळविण्यासाठी प्रयत्नशील आहे.
जिल्ह्यातील जलाशयांची संख्या मर्यादित असताना वाढत्या नागरिकरणामुळे पाण्याची मागणी वाढत असल्याने ती पूर्ण करताना जलसंपदा विभागाला आता उपलब्ध जलाशयांमधून ती पूर्ण करावी लागत आहे. यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांबरोबरच खासगी संस्थांकडूनही पाणी कोटा उपलब्ध करुन देण्याविषयी जलसंपदा विभागाकडे वारंवार मागणी होत आहे.
कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालकांच्या वतीने महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानांतर्गत चाकण नगरपरिषददेला घरगुती वापरासाठी पाणी कोटा उपलब्ध करुन देण्याचा प्रस्ताव जलसंपदा विभागाला प्राप्त झाला होता. तर यापुर्वीच चाकण नगरपरिषदेला भामा आसखेड धरणातून 3.4896 दशलक्ष घन मीटर पाणीसाठा मंजूर असून, त्याचा वापर नगरपरिषदेकडून केला जात आहे.
तर शासन निर्णयानुसार बिगर संचन मोठ्या प्रमाणात पाण्याचा हक्क प्रस्तावांना मंजुरी देण्यासाठी क्षेत्रिय वाटपाच्या मर्यादेनुसार सुधारित स्तर निश्चित करण्यात आलेला आहे. नव्या शासन निर्णयानुसार चाकण नगरपरिषदेची 2015 मधील लोकसंख्या लक्षात घेत, वाढीव 5.562 दशलक्ष घन मीटर पाणी कोट्यास जलसंपदा विभागाने मंजुरी दिली आहे.
दरम्यान, पीएमआरडीएच्या वतीने मावळ तालुक्यातील कुरवंडे येथे टायगर व लायन पॉइंट विकसित केला जात आहे. हे पॉइंट विकसित करण्यासाठी वाणिज्यिक वापरासाठी पाण्याची गरज भासणार असल्याचा प्रस्ताव जलसंपदा विभागाला प्राप्त झाला होता.
याशिवाय याठिकाणी पर्यटकांचा वावर वाढणार असल्याने पाणी कोटा उपलब्ध करुन देण्याची या प्रस्तावात मागणी करण्यात आलेी होती. या योजनेसाठी 2055 सालची लोकसंख्या लक्षात घेत पवना धरणातून 0.0591 दशलक्ष घन मीटर पाणीसाठा उपलब्ध करुन देण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे.
डी. वाय. पाटील अॅकडमीला वडिवळे धरणातून पाणीसाठा मंजुर
दरम्यान मावळ तालुक्यातील आंबी येथील डी. वाय. पाटील एज्युकेशन अॅकॅडमीच्या शैक्षणिक संकुलातील विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांची संख्या लक्षात घेता, या संस्थेच्या वतीने वडिवळे धरणातून पाणीसाठा उपलब्ध करुन देण्याची मागणी करण्यात आली होती.
या योजनेची 2041 सालची लोकसंख्या लक्षात घेऊन या संस्थेला पिण्यासाठी 0.1061 दशलक्ष घन मीटर पाणी कोटाउपलब्ध करुन देण्याच्या प्रस्तावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.