शंकर दुपारगुडे
कोपरगाव – राज्यासह देशात करोनाच्या संसर्गाने नागरीकांची झोप उडाली आहे.दिवसेंदिवस करोना बाधितांची संख्या वाढत आहे. सरकारने यावर नियंत्रण आणण्यासाठी लॉकडाऊन केले. तरी रस्त्यावर फिरणाऱ्यांची गर्दी काही कमी होत नाही. या फिरणाऱ्यांवर कडक कारवाई केली जात आहे. पण त्यातून सुटका करण्यासाठी एकाने सर्रास मोटारसायकलवर “भारत सरकार’ असे रेडियमने छापून आपला रस्त्यावर फिरण्याचा मार्ग मोकळा केला आहे. या महाशयाने ही शक्कल लढवित पोलीस प्रशासनाच्या डोळ्यात धुळफेक केली आहे.
लॉकडाऊनच्या काळात अति महत्वाच्या कामासाठी घराबाहेर पडण्याची परवानगी देण्यात आली आहे. जीवनावश्यक वस्तु खरेदी करणे, सरकारी कर्मचारी, अधिकारी, पोलीस, डॉक्टर, पत्रकार यांच्या वाहनांच्या वाहतुकीला परवानगी देण्यात आली आहे. याचाच गैरफायदा घेत काहींनी जीवनावश्यक तातडीच्या सेवेच्या नावाखाली ओळखपत्र गळ्यात घालुन कोठेही फिरत आहेत. काहींनी आपल्या चारचाकी, दुचाकीवर अत्यावश्यक सेवेचे फलक लावून रस्त्यावर फिरत आहेत. असे काहीतरी छापून गाडी घेवून जाता येते याचा अंदाज बांधून एकाने तर स्वतःच्या मोटारसायकलवर रेडियमने चक्क “भारत सरकार’ छापून मिरवत आहेत. आता त्याच्या मोटारसायकलवर लाल दिवा लावणे इतकच बाकी होत.
कोपरगाव शहरातील एका पेट्रोल पंपावर सकाळी पेट्रोल भरण्यासाठी मोटारसायकल स्वार आला. त्याच्या मोटारसायकलच्या खोपडीवर लिहिले नाव वाचून अनेकांचे डोळे फिरले. इतका मोठा व्हिआयपी माणूस किती साधा राहतो, असे ते वाचल्यावरून जाणवते. लिहीले अक्षर लक्षपुर्वक वाचल्यानंतर नक्की कोणत्या विभागाच्या अधिकाऱ्याची गाडी आहे, हे मात्र उपस्थितांना समजत नव्हते. त्या मोटारसायकलच्या खोपडीवर लाल रंगात ठळक अक्षरात लिहिले होते ते असे, “ए/सी/भारत सरकार ए/ रकिंवर के श्री सिंह. गर्व्हमेट ऑफ इंडिया, सत्यमेव जयते, भारत सरकार कुटुंब परिवार’ असा मजकुर छापला होता. तर मधोमध आपल्या राष्ट्राची राजमुद्रा- बोधचिन्ह छापण्यात आले होते.
मोटारसायकलवरचा नंबर महा 17 अअ 5202 आहे. गाडीवरील नंबर व छापलेले नाव संभ्रम करणारे होते.
अशी ही भारत सरकार मान्य मोटारसायकल व त्यावरील व्यक्ती केवळ कोणी आपल्याला रस्त्यावर अडवू नये, रस्त्यावर पोलिसापासून सुटका व्हावी, यासाठी ही अनोखी शक्कल लढविली आहे. त्याला आमच्या प्रतिनिधीने विचारले की, आपण नक्की कोणत्या विभागात काम करता. तेव्हा त्याने उडवाउडवीचे उत्तर देत येवला तालुक्यातील असल्याचे सांगत मोटारसायकलवर सुसाट वेगाने निघुन गेला. दरम्यान, यापुर्वी आपण भाऊ, दादा, काका, नाना राजकीय रंगीबेरंगी नावे नंबर पाहिले होते. सामाजिक, धार्मिक बोधचिन्ह असलेले नावे पाहीले. परंतु थेट भारत सरकार आणि देशाची राजमुद्रा छापून मोकाट मोटारसायकल फिरणाऱ्या हा व्यक्ती कोण याचा तपास घेणे आवश्यक आहे.