पुणे – पावसात चिंब भिजल्यानंतर गरमागरम स्वीटकॉर्नला (पिवळा मका) पर्यटकांकडून वाढली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील विविध पर्यटनस्थळांवरून या मक्याची मागणी वाढली आहे. मागील दहा ते पंधरा दिवसात आवक वाढली आहे. त्या तुलनेत मागणी जास्त असल्यामुळे भावातही सुमारे 20 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
सध्या मार्केट यार्डात दीड हजार ते दोन हजार पोते मक्याची आवक होत आहे. एका पोत्यामध्ये 38 ते 40 किलो स्वीटकॉर्न असते. घाऊक बाजारात प्रतवारीनुसार प्रतिकिलोस 10 ते 15 रुपये भाव मिळत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा मिळणारा हा भाव अधिक आहे. त्यामुळे शेतकरी काही प्रमाणात समाधानी आहेत.
पावसाळ्याच्या वातावरणामुळे शहरात खडकवासलापासून ते सिंहगडापर्यंत मक्याच्या कणसाला आता चांगली पसंती मिळू लागली आहे. लोहगड, लोणावळा, महाबळेश्वरसह शहरातील आणि उपनगरातील किरकोळ विक्रेत्यांकडून चांगली मागणी आहे. सुटीचा आनंद लुटण्यासाठी पर्यटनासाठी पुणेकर घराबाहेर पडू लागले आहे. येथील बाजारात जिल्ह्याच्या मंचर, चाकण, खेड, नारायणगाव आदी भागासह नाशिक जिल्ह्यांतून मोठ्या प्रमाणात आवक होत असल्याचे व्यापारी पांडुरंग सुपेकर आणि माऊली आंबेकर यांनी सांगितले.
गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यातील सिंहगड, खडवासला धरण, भुशी धरण, लोणावळा, खंडाळा आदी परिसरातील ग्राहकांकडून पिवळ्या मक्याला मोठी मागणी आहेत. वर्षभर मिळणारे कणीस म्हणजे पिवळेधमक अमेरिकन स्वीट कॉर्न म्हणून बाजारात ओळखले जाते. गेल्या काही वर्षांत पिवळ्या मक्याच्या मागणी व आवकेत दिवसेंदिवस वाढ होत आहे.
स्वीटकॉर्नची आवक आणि मागणी वाढली आहे. पंधरा दिवसांत स्विटकॉर्नच्या भावात वाढ झाली आहे. येत्या काही दिवसात आवक आणि भावात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे, असे मार्केट यार्डचे व्यापारी पांडुरंग सुपेकर म्हणाले.