पिंपरी – पिंपळे निलख येथे रविवारी रात्री टोळक्याने धुडगूस घालत सात वाहनांची तोडफोड केली. या प्रकरणी गुन्हे शाखा युनिट चारच्या पथकाने अवघ्या चार तासात ११ जणांना ताब्यात घेतले. त्यापैकी सातजण अल्पवयीन असल्याचे समोर आले आहे.
राजकुमार आरसन पिल्ले (वय २५, रा. शारदा कॉलनी, पिंपळे निलख) यांनी याबाबत सांगवी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. कुणाल राजेंद्र सरतापे (वय २०), चेतन रामनवल साहानी (वय २२, दोघेही रा. कस्तुरबा गांधी वसाहत, बौध्द विहार, औंध, पुणे), रोहन कुमार जोगदंड (वय २२), यशवंत सुनिल अवघडे (वय २१, दोघेही रा. इंदीरा वसाहत, आंबेडकर चौक, औंध पुणे) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. सांगवी पोलिसांसह या गुन्ह्याचा समांतर तपास गुन्हे शाखा युनिट चारचे पथक करीत होते. गुन्हे शाखेने अवघ्या चार तासात ११ आरोपींना ताब्यात घेतले. त्यापैकी सात आरोपी अल्पवयीन असल्याचे समोर आले आहे.
तोडफोडीची घटना ही दहशत माजवण्याच्या उद्देशाने घडली असल्याने व त्यामुळे परिसरात भितीचे वातावरण पसरले होते. या गुन्ह्यातील बहुतांशी आरोपी अनोळखी असल्याने त्यांचा शोध घेण्यास पोलिसांना अडचण झाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे मुख्य आरोपी हा विधीसंघर्षीत बालक असुन तो त्याच्या एका साथीदारासह पिंपळे निलख स्मशानभुमी जवळ लपला असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे एकूण ११ जणांना ताब्यात घेतले.
पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई, अपर आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त सुधीर हिरेमठ, सहायक आयुक्त राजाराम पाटील, यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट चारचे वरिष्ठ निरीक्षक मोहन शिंदे, ‘ सहायक निरीक्षक अंबरिष देशमुख, कर्मचारी संजय गवारे, नारायण जाधव, प्रविण दळे, धर्मराज आवटे, लक्ष्मण आढारी, तुषार शेटे, संतोष असवले, मोहम्मद गौस नदाफ, वासुदेव मुंडे, शावरसिध्द पांढरे, प्रशांत सैद, तुषार काळे, सुरेश जायभाये, धनाजी शिंदे, आदिनाथ ओंबासे, नागेश माळी, राजेंद्र शेटे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.