भाजपामध्ये खासदारांना डावलण्याचे सत्र सुरूच

स्थायी समितीच्या कार्यालयातील छायाचित्रामधूनही अमर साबळे गायब

चूक दुरुस्ती केली जाईल – एकनाथ पवार

स्थायी समितीच्या अध्यक्षांनी जे छायाचित्र कार्यालयात लावले आहे, ते मी पाहिलेले नाही. मी याबाबत माहिती घेणार आहे. जर खासदार अमर साबळे यांना डावलले असेल तर ती पक्षाची भूमिका नसून झालेली चूक दुरुस्त केली जाईल. साबळे हे आमचे नेते असून पक्षातील त्यांचे स्थान मानाचेच असल्याची प्रतिक्रिया सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी दिली.

फोन घेण्याचे टाळले

साबळे यांना डावलण्यात आलेल्या प्रकाराबाबत स्थायी समितीचे अध्यक्ष विलास मडिगेरी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता ते उपलब्ध होऊ शकले नाहीत. वारंवार फोन करूनही त्यांनी फोन घेण्याचे टाळले.

पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहर भाजपाला निष्ठावंत आणि आयाराम गयारामांमधील वाद कायम असताना आता निष्ठावंतांमध्येही दुफळी निर्माण झाल्याचे आज समोर आले आहे. स्वत:ला निष्ठावंत म्हणवून घेणाऱ्या स्थायी समिती अध्यक्षांनी आपल्या कार्यालयात लावलेल्या छायाचित्रामधून अमर साबळे यांना डावलले आहे. या प्रकारामुळे भाजपामधील दुही पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे.

पिंपरी-चिंचवड शहर भाजपाला सुरुवातीपासून दुफळीने त्रस्त केले होते, ते आजपर्यंत कायम आहे. पूर्वी गडकरी-मुंडे असे दोन गट शहर पातळीवर कार्यरत होते. मात्र सन 2014 साली केंद्रात नरेंद्र मोदी यांच्या रुपाने दृष्टा नेता भाजपाला मिळाला आणि गल्ली ते दिल्ली पक्षाने सत्तेची अनेक केंद्रे काबीज केली. पिंपरी-चिंचवड शहरात बोटावर मोजण्याएवढी असलेली भाजपा सत्तेत पोहचली. पिंपरी-चिंचवड महापालिकेवर एकहाती सत्ता, एक खासदार, दोन आमदार, प्राधिकरणाचे अध्यक्षपद अशी मानाची सत्ताकेंद्रे भाजपाच्या ताब्यात आहेत.

महापालिकेमध्ये सन 2017 साली भाजपाची सत्ता आली. सत्ता आल्यानंतर शहरवासियांची कामे करण्यापेक्षा छायाचित्रे लावणे, ठेकेदारांवर मेहरनजर होणे असे प्रकार चालू आहेत. या प्रकारामुळे ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोडांवर भाजबाबत नाराजी व्यक्त होत असताना अंतर्गत दुफळी समोर असल्यामुळे त्याचा फटका पक्षाला बसण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे.
निष्ठावंतांमध्येही दुफळी मात्र, आयाराम आणि निष्ठावंत अशी दुफळी गेल्या काही वर्षांत शहरातील भाजपाला लागलेली वारंवार समोर आली आहे.

अमर साबळे यांच्या रुपाने पिंपरी-चिंचवड शहर भाजपातील नेत्याला खासदारकी मिळाली. मात्र सुरुवातीचा काही काळ वगळता साबळे यांना संघटनेपासून आणि सत्तेपासून दूर ठेवण्याचाच एककलमी कार्यक्रम राबविण्यात आला. त्यातच निष्ठावंत गटाच्या पाठीशी उभे राहणाऱ्या साबळे यांना काही नेत्यांनी दूर ठेवले. एका बाजूला सत्ता केंद्र बनलेले नेते साबळे यांना दूर ठेवत असतानाच आता निष्ठावंतांनीही साबळे यांना दूर ठेवण्याचा प्रयत्न केल्यामुळे आश्‍चर्य व्यक्‍त होत आहे.

स्थायी समितीचे अध्यक्ष विलास मडिगेरी यांनी आपल्या (महापालिकेतील) कार्यालयात भाजपा नेत्यांची छबी असलेला फ्रेम केलेला फोटो लावला आहे. या छायाचित्रात त्यांनी नरेंद्र मोदी, अमित शहा, देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, रावसाहेब दानवे, लक्ष्मण जगताप आणि महेश लांडगे यांची छायाचित्रे लावली आहेत. मात्र शहरातील भाजपचे एकमेव खासदार असलेल्या साबळे यांना डावलण्यात आल्यामुळे नाराजी व्यक्त होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.