व्यायामशाळांना दिले जाणारे सेवाशुल्क होणार बंद

क्रीडा समितीसाठी स्वतंत्र स्थापत्य विभागास मान्यता 

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शहरात 82 व्यायामशाळा आहेत. त्या स्थानिक मंडळांमार्फत चालविल्या जात असून त्यांना दरमहा सेवाशुल्क म्हणून दोन हजार रुपये दिले जातात. हे सेवाशुल्क यापुढे दिले जाणार नसल्याची माहिती क्रीडा समितीचे सभापती तुषार हिंगे यांनी दिली. या निर्णयामुळे पालिकेची दरवर्षी तब्बल 20 लाख रुपयांची बचत होणार आहे. तसेच महापालिकेच्या क्रीडा विभागाचा स्वतंत्र स्थापत्य विभाग निर्माण करण्याच्या विषयालाही मान्यता देण्यात आल्याचे हिंगे यांनी सांगितले.

क्रीडा समितीची सभा पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी तुषार हिंगे होते. सभेला समिती सदस्य विकास डोळस, बाबा त्रिभुवन, सागर गवळी, अपर्णा डोके, सहाय्यक आयुक्‍त अण्णा बोदडे आदी उपस्थित होते. तुषार हिंगे बैठकीतील निर्णयाबाबतची माहिती देताना पुढे म्हणाले, पालिकेच्या शहरात एकूण 82 व्यायामशाळा आहे. त्या सार्वजनिक मंडळ, स्वयंसेवी संस्था, प्रतिष्ठान आणि सामाजिक संस्थांना चालविण्यासाठी दिल्या जातात. या संस्थांना दरमहा दोन हजार रूपये सेवाशुल्क दिले जाते. तसेच, पालिका व्यायामशाळेसाठी साहित्य पुरविते. अनेक मंडळे व संस्था व्यायामशाळा व्यवस्थितपणे चालवित नाहीत. काही व्यायामशाळा बंदच आहेत, तर अनेक ठिकाणी व्यायामाचे साहित्य चोरीला गेले आहे. यासह अनेक तक्रारी क्रीडा विभागास प्राप्त झाल्या आहेत. त्याची दखल घेऊन क्रीडा समितीने त्या मंडळांना दरमहा सेवाशुल्क देणे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. संबंधितांना दरमहा वीज बिल भरून ते क्रीडा विभागात सादर करणे सक्तीचे केले आहे.

तसेच पालिकेत झोनिपु, उद्यान, बीआरटीएस अशा विभागासाठी स्वतंत्र स्थापत्य विभाग आहेत. मात्र, क्रीडा विभागासाठी स्थापत्य विभाग नसल्याने क्रीडा विभागाची कुंचबणा होत आहे. परिणामी, महिनोंमहिने कामे प्रलंबित राहतात. अधिकारी दाद देत नाहीत, हे टाळण्यासाठी क्रीडा स्थापत्य विभाग स्थापन करण्याचा निर्णय समितीने घेतला आहे, असे हिंगे यांनी सांगितले. महापौर चषक शालेय क्रीडा स्पर्धा आयोजनास स्थायी समितीने मंजुरी दिली. त्याप्रमाणे क्रीडा समितीनेही त्यास मान्यता दिली आहे. विविध खेळांसाठी सरावासाठी मैदान उपलब्ध व्हावे म्हणून “पीपीपी’ तत्वावर प्रायोजिक तत्वावर छोटी-छोटी मैदाने विकसित केली जाणार असल्याची माहितीही हिंगे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.