बॉलीवूड सुपरस्टार आमिर खान आणि सोनाली बेंद्रे यांच्या “सरफरोश’ चित्रपटाचा सिक्वल येणार आहे. विशेष म्हणजे हा चित्रपट सीआरपीएफ जवानांसाठी समर्पित करण्यात येणार आहे. चित्रपट निर्माता जॉन मॅथ्यू मॅथन यांनी हा चित्रपट केंद्रीय राखीव पोलीस दलास समर्पित करण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे. मॅथन यांना 1999मध्ये प्रदर्शित झालेल्या “सरफरोश’ चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला आहे.
या चित्रपटाच्या सीक्वलबाबत ते म्हणाले की, “सरफरोश-2’चे पटकथा पूर्ण करण्यापूर्वी ती मी पाच ते सहावेळा लिहून काढली आहे. वास्तवमध्ये ही “सरफरोश-2’ची पाचवी पटकथा आहे. या पटकथेला आता अंतिम रूप देण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. या चित्रपटाचा सिक्वल हा भारताच्या अंतर्गत सुरक्षा व्यवस्थेवर आधारित आहे.
यात विविध समस्या निर्माण होत असतानाही भारताची सुरक्षा व्यवस्था मजबूत असल्याचे दाखविण्यात येणार आहे. दरम्यान, या चित्रपटातील कलाकार अद्याप निश्चित करण्यात आलेले नाही. “सरफरोश’मध्ये आमिर खानसह नसरुद्दीन शाह यांनी मुख्य भूमिका साकारली होती. आता या सिक्वलमध्ये कोण-कोण झळकणार आहे याबाबत चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.