पुणे: आयटीएफ महिला टेनिस स्पर्धेत एकेरीत पहिल्या फेरीत भारताच्या श्रीवल्ली रश्मिका भामिदिप्तीने सनसनाटी विजय मिळवत दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. या स्पर्धेत एकेरीत मुख्य ड्रॉमध्ये पहिल्या फेरीत भारताच्या वाईल्ड कार्डद्वारे प्रवेश केलेल्या श्रीवल्ली रश्मीका भामिदिप्ती हिने क्वालिफायर रशियाच्या एव्हेग्निया बर्डीनचा 6-4, 6-4 असा पराभव करून दुसरी फेरी गाठली.
पात्रता फेरीतून मुख्य फेरीत प्रवेश केलेल्या थायलंडच्या पुनिन कोवा पिटुक्टेड हिने जपानच्या क्योका ओकामुराचा 7-5, 6-1 असा पराभव करून अनपेक्षित निकाल नोंदविला. बेलारूसच्या शालिमार तालबी हिने ग्रीसच्या डेस्पीना पापामिकॅइलचा 6-4, 3-6, 6-1 असा तीन सेटमध्ये पराभव करून सनसनाटी निकालाची नोंद केली.
नॉर्वेच्या उलरिके एकेरी हिने भारताच्या वाईल्ड कार्डद्वारे प्रवेश केलेल्या शरण्या गवारेचा 6-1, 6-0 असा सहज पराभव केला. जपानच्या रिसा उशिजिमा हिने रशियाच्या क्वालिफायर याशीना एकतेरिनाचे आव्हान 6-4, 7-5 असे संपुष्टात आणले.
स्पर्धेचे उदघाटन वेंकीज इंडिया लिमिटेडचे सरव्यवस्थापक विजय तिजारे, एनइसीसीचे महाव्यवस्थापक बीएसआर शास्त्री, एमएसएलटीएचे मानद सचिव सुंदर अय्यर, एमएसएलटीएचे आजीव उपाध्यक्ष आनंद तुळपुळे आणि डेक्कन जिमखानाचे सरचिटणीस विश्वास लोकरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डेक्कन जिमखानाच्या क्रीडा समितीचे सदस्य गिरीश इनामदार, स्पर्धेचे संचालक व टेनिस विभागाचे सचिव आश्विन गिरमे आणि आयटीएफ गोल्ड बॅच रेफ्री शीतल अय्यर आदी मान्यवर उपस्थित होते.