तेहरान : हमास या पॅलेस्टीनी संघटनेचा प्रमुख इस्माइल हनियेह यांची इराणच्या तेहरानमध्ये ज्या प्रकारे हत्या करण्यात आली त्यामुळे सगळे जग स्तब्ध झाले. ज्या गेस्ट हाउसमध्ये हनियेह थांबणार होते तेथे दोन महिने अगोदरच बॉम्ब ठेवण्यात आले होते अशी माहिती समोर आणली जाते आहे. इराणच्या नव्या राष्ट्रपतींच्या शपथविधीसाठी हनियेह इराणला नक्की येणार अशी इस्त्रायलच्या गुप्तचर संघटनेला म्हणजे मोसादला खात्री होती. ते याच गेस्ट हाउसमध्ये थांबतील हेही मोसादला माहिती होते. या संपूर्ण कटाच्या अमलबजावणीसाठी त्यांनी इराणच्याच एजंटस्चा वापर केला. त्यांच्या या योजनेमुळे इराणच्या अन्य नेत्यांमध्येही आता इस्त्रायलबद्दल दहशत निर्माण झाली असल्याचा दावा आता केला जातो आहे.
टेलिग्राफने दिलेल्या बातमीनुसार बॉम्ब पेरण्यासाठी मोसादने इराणच्याच सुरक्षा दलातील लोकांना हाताशी धरले. मे महिन्यात इराणचे माजी राष्ट्रपती इब्राहीम रईसी यांच्या अंत्यविधीत सहभागी होण्यासाठी जेंव्हा हनियेह इराणला आले होते त्याचवेळी त्यांची हत्या करण्याची योजना होती. मात्र प्रचंड गर्दी असल्यामुळे त्यावेळी ही योजना पूर्ण होऊ शकली नाही. टेलिग्राफशी बोलताना इराणच्या सुरक्षा दलाच्या दोन अधिकाऱ्यांनी सांगितले त्यावेळी कट अयशस्वी होण्याचीच शक्यता अधिक असल्यामुळे तेंव्हा योजना स्थगित करण्यात आली होती.
तीन खोल्यांमध्ये लावले होते बॉम्ब
बुधवारी हनियेह ज्या कक्षात अथवा खोलीत झोपले होते तेथेच मोठा स्फोट झाला. त्यातच त्यांचा आणि त्यांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या रक्षकांचा मृत्यू झाला. मोसादसाठी काम करणाऱ्या दोन इराणी एंजटस्नी खुलासा केला की तीन ठिकाणी बॉम्ब लावण्यात आले होते. हनियेह अगोदरही जेंव्हा इराणला आले होते तेंव्हा ते याच गेस्ट हाउसमध्ये थांबले होते. त्यामुळे ते पुन्हा येथेच मुक्काम करतील असा मोसादचा अंदाज होता व तो खरा ठरला. त्यामुळेच ते ज्या खोलीत थांबतील किंवा ज्या खोलीत थांबण्याची शक्यता आहे अशा तीनही ठिकाणी बॉम्ब लावण्यात आले होते.
पश्चिमेकडील देशांत अमेरिकेच्या सीआयए या गुप्तचर संघटनेनंतर इस्त्रायलची मोसाद हीच सगळ्यांत शक्तीशाली संघटना आहे. या संघटनेचे तब्बल ७ हजार एजंट आहेत. त्यांचे वार्षिक बजेट जवळपास ३ अब्ज डॉलर आहे. संघटनेची अंतर्गत रचना कशी आहे त्याचीही कोणाला माहिती नाही. केवळ पॅलेस्टीनच्या लष्करातच नाही तर लेबनान, सीरिया आणि इराणच्याही लष्करात मोसादचे हस्तक आहेत. सर्वोच्च स्तरावरच्या हत्या करण्यासाठी मोसादचा मेतसादा विभाग काम करतो.