मेट्रोच्या सुरक्षा रक्षकांचीच सुरक्षा राम भरोसे

ठेकेदाराचे दुर्लक्ष : सुरक्षा साधने देण्याकडे कानाडोळा 

पिंपळे गुरव – मेट्रो प्रकल्पाच्या ठिकाणी काम करणाऱ्या सुरक्षा रक्षकांची सुरक्षा राम भरोसे आहे. सुरक्षा रक्षक पुरविणाऱ्या ठेकेदाराने या सुरक्षा रक्षकांना कोणतीही सुरक्षा साधने दिली नाहीत, तसेच किमान वेतन दिले जात नसल्याचा आरोप श्रमिक संस्थेने केला आहे.

गेल्या काही वर्षांपासून पिंपरी-चिंचवड ते पुणे परिसरात मेट्रोचे काम सुरू आहे. त्यासाठी वेगवेगळ्या कामासाठी वेगवेगळे ठेकेदार नेमण्यात आले आहेत. सुरक्षा रक्षक पुरविण्यासाठी स्वतंत्र ठेकेदार नेमण्यात आला आहे. मात्र, या ठेकेदाराकडून सुरक्षेची कोणतीही काळजी घेतली जात नसल्याने सुरक्षा रक्षकांचीच सुरक्षा धोक्‍यात असल्याची तक्रार येथील कामगार करीत आहेत.
सुरक्षा रक्षकांना मिळणारे वेतन अत्यल्प आहे.

सुरक्षेऐवजी अन्य कामे त्यांच्याकडून करुन घेतली जातात. या रक्षकांची सतत वर्दळ असलेल्या महामार्गालगत राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. आडोशाला मिळेल त्या ठिकाणी हे सुरक्षा रक्षक राहत असल्याने त्यांच्या आरोग्याचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. त्यातच त्यांना गणवेश, बुट व इतर साधने दिली गेली नाहीत. ठेकेदाराकडील अधिकारी कधीही याठिकाणी येत नाहीत.

18 जुलै रोजी एका कामगाराच्या डोळ्याला इजा झाली. मात्र, ठेकेदाराकडे तक्रार करुनही त्याने दाद दिली नाही. श्रमिक या सामाजिक संस्थेने या कामगाराला पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात (वायसीएमएच) नेवून त्याच्यावर उपचार केले. ठेकेदाराच्या मनमानी कारभाराबाबत कामगारांनी संताप व्यक्त केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)